दोन टवाळखोरांना जमावाने दिला चोप

Crime
Crime

धुळे - पळवून घेऊन जाण्याची धमकी देत महाविद्यालयीन अल्पवयीन युवतींचा भरवस्तीत हात पकडणाऱ्या दोन टवाळखोरांना जमावाने चोप देत देवपूर पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, दोघांविरुद्ध स्त्री अत्याचार व विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. या प्रकाराने महाविद्यालयीन युवती चांगल्याच भयभीत झाल्या आहेत.

शहरातील जुने धुळे परिसरातील तीन महाविद्यालयीन युवती देवपूरमधील महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून देवपूरमधील दोन तरुण वारंवार पाठलाग करीत होते. देवपूर प्रभातनगर परिसरात काल (ता.२९) दुपारी चारच्या सुमारास दोघा तरुणांनी त्या युवतींना रस्त्यात गाठले. दोघांनी युवतींच्या अंगावर चिठ्ठ्या फेकून मोबाईलवर संपर्क साधण्याचा आग्रह केला, ‘तुझ्या मैत्रिणीसह भेटायला ये, अन्यथा मी तुला पळवून घेऊन जाईल, माझ्या हाताची नस कापून तुझे नाव सांगेल, आत्महत्या करेल’ थेट अशी धमकीही दोघा तरुणांनी दिली. नेहमीची छेड आणि काल दिलेल्या धमकीमुळे युवती घाबरल्या होत्या. 

अज्ञातांनी दिला चोप
युवतींनी याबाबत कुटुंबीय व मावळा संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. सचिन जाधव यांना घडलेला प्रकाराची माहिती दिली. त्यांनी देवपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनाही माहिती दिली.  त्यानुसार दोघा तरुणांना भेटण्यासाठी बोलावण्याचे नियोजन केले. आज सायंकाळी पाचच्या सुमारास दोघे तरुण शहरातील पांझरा नदीलगत चौपाटीजवळ तरुणींना भेटण्यासाठी आले. त्यांनी थेट रस्त्यातच युवतीचा हात धरून छेड काढली. यावेळी ॲड. जाधव व कुटुंबीयांनी देवपूर पोलिसांना माहिती दिली. पोलिस येण्यापूर्वीच युवतीच्या छेडखानीचा प्रकार काहींच्या निदर्शनास येताच संतप्त नागरिकांनी दोघा तरुणांना चांगलाच चोप दिला. दोघांना देवपूर पोलिसांच्या स्वाधीन केले. दोघा तरुणांविरुद्ध रात्री उशिरा स्त्री अत्याचार व विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. निरीक्षक गांगुर्डे तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com