फ्लॅट सोडण्यासाठी मागितली खंडणी; संशयित महिलेविरोधात गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जून 2019

नाशिक - फ्लॅट खरेदीचा व्यवहार करताना, आर्थिक अडचणीतून व्यवहार फिस्कटला. त्यानंतरही संशयित महिलेने बेकायदेशीररीत्या कब्जा केलेला फ्लॅट सोडण्यासाठी सहा लाखांची मागणी केली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत संशयित महिलेविरोधात खंडणीच्या गुन्ह्यासह ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. 

नाशिक - फ्लॅट खरेदीचा व्यवहार करताना, आर्थिक अडचणीतून व्यवहार फिस्कटला. त्यानंतरही संशयित महिलेने बेकायदेशीररीत्या कब्जा केलेला फ्लॅट सोडण्यासाठी सहा लाखांची मागणी केली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत संशयित महिलेविरोधात खंडणीच्या गुन्ह्यासह ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. 

हेमलता बागल असे संशयित महिलेचे नाव आहे. स्वरूपासिंग वसावे या 64 वर्षीय महिलेचा चेतनानगर येथील मधुरा अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे. त्यांनी हा फ्लॅट विक्रीसाठी काढला होता. 2017 मध्ये संशयित हेमलता बागल व श्रीमती वसावे यांच्यात फ्लॅट खरेदीचा व्यवहार झाला. आगाऊ रक्कम म्हणून संशयित बागल हिने एक लाख 11 हजार रुपये दिले. उर्वरित रक्कम गृहकर्ज मंजुरीनंतर देण्याचे ठरले. परंतु संशयितेचे गृहकर्ज मंजूर झाले नाही. त्यामुळे फ्लॅटचा आर्थिक व्यवहार फिस्कटला. संशयितेने आगाऊ दिलेल्या रकमेची मागणी केली असता, श्रीमती वसावे यांच्याकडे तत्काळ देण्यासाठी रक्कम नव्हती. त्यामुळे त्यांनी विनाभाड्यापोटी संशयित महिलेस फ्लॅट राहण्यास दिला. 

श्रीमती वसावे यांनी सप्टेंबर 2018 मध्ये संशयित महिलेची एक लाख 11 हजारांची रक्कम परत केली. त्यानंतर संशयितेने हा फ्लॅट सोडणे अपेक्षित असताना, टाळाटाळ केली. श्रीमती वसावे यांनी वकिलामार्फत नोटीस बजावली. तरीही संशयित फ्लॅट सोडत नव्हती. उलट या फ्लॅटचा ताबा सोडण्यासाठी सहा लाखांच्या खंडणीची मागणी केली. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत धाव घेत, संशयित हेमलता बागल हिच्याविरोधात खंडणीसह अनुसूचित जाती-जमाती अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The crime against the suspect accused of leaving the flat

टॅग्स