ओसाड डोंगराळ भागात फुलला होता अफुचा मळा; पोलिसांना खबर लागताच मारला छापा !

भगवान जगदाळे,
Friday, 19 February 2021

निजामपूर पोलिसांच्या पथकाने ६ क्विंटल ७५ किलो अफूची बोंडे व हिरवी झाडे असा सुमारे १३ लाख ३१ हजार सहाशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

निजामपूर (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर पोलीस स्टेशन हद्दीतील भामेर (ता.साक्री) शिवारात ओसाड व डोंगराळ ठिकाणावरच्या दोन लगतच्या शेतांमध्ये अवैधरित्या सुमारे २ ते ५ फूट उंचीच्या अफूच्या पिकाची बेकायदेशीर लागवड केलेली आढळून आल्याने महसूल व कृषी विभागाच्या अधिकारांच्या उपस्थितीत निजामपूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. त्यात पोलिसांनी सुमारे साडेतेरा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलीस हवालदार आशिष कांगणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निजामपूर पोलीस ठाण्यात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला असून २ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

आवर्जून वाचा- अवकाळीचे संकट; धुळे, नंदुरबार जिल्‍ह्यांत गारांसह पाऊस 
 

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार काल दुपारी तीनच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली. नायब तहसीलदार व्हीडी ठाकूर, मंडळाधिकारी विजय बावा, तलाठी प्रशांत माळी, कृषी सहाय्यक मीनाक्षी वाघ आदीही यावेळी उपस्थित होते. निजामपूर पोलिसांच्या पथकाने ६ क्विंटल ७५ किलो अफूची बोंडे व हिरवी झाडे असा सुमारे १३ लाख ३१ हजार सहाशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. मुकुंदा हसन जाधव (वय-५८, रा.भामेर) व अशोक एलजी निकुंभ (वय-५५, रा.भामेर) अशी संशयितांची नावे आहेत.

पाच क्विंटल अफू

आरोपी मुकुंदा जाधवच्या शेतात सुमारे दहा लाख रुपये किमतीचा जवळपास ५ क्विंटल मुद्देमाल हस्तगत झाला. तर आरोपी अशोक निकुंभच्या शेतात सुमारे साडेतीन लाखावर किमतीचा जवळपास २ क्विंटल मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधितांनी वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी राज्यात बंदी असतानाही मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या अफूची लागवड केल्याचे निष्पन्न झाले आहे. सहाय्यक फॉरेन्सिक विश्लेषक शशिकांत अहिरे, चालक मिस्तरी यांनी संबंधित मुद्देमाल अफूच असल्याची ओळख पटवली. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आवर्जून वाचा- राज्य शासनाने चुका केल्या, आणि त्यामुळेच राज्यात कोरोना पून्हा वाढला !     
 

या पथकाने केली कारवाई

साक्रीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकात सहाय्यक निरीक्षक शिरसाठ यांच्यासह हवालदार कांतीलाल अहिरे, आशिष कांगणे, सुधाकर शेंडगे, भटू पाटील, नरेंद्र माळी, श्री.जाधव, अवधूत होंडे, चालक प्रमोद कुंभार, अमरसिंग पवार आदींचा समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत निजामपूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ घटनेचा पुढील तपास करीत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलीस उपअधीक्षक प्रदीप मैराळे यांनी ही धडक कारवाई करणाऱ्या पोलीस पथकाचे विशेष कौतुक केले आहे.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime marathi news dhule police seize six quintals opium poppy cultivation