esakal | मतदान होवू नये यासाठी नवनिर्वाचित सदस्याचे अपहरण; आणि सिनेस्टाईल केली सुटका
sakal

बोलून बातमी शोधा

मतदान होवू नये यासाठी नवनिर्वाचित सदस्याचे अपहरण; आणि सिनेस्टाईल केली सुटका

तीन विरुद्ध तीन अशी परिस्थिती ग्रामपंचायतीत असल्यामुळे दत्तू भिल यांना मतदान करता येऊ नये या उद्देशानेच त्यांचे अपहरण झाल्याची घटना घडली.

मतदान होवू नये यासाठी नवनिर्वाचित सदस्याचे अपहरण; आणि सिनेस्टाईल केली सुटका

sakal_logo
By
सचिन पाटील

शिरपूर : सरपंच-उपसरपंचाच्या निवड प्रक्रियेत मतदान करता येऊ नये, या उद्देशाने साकवद (ता. शिरपूर) येथील ग्रामपंचायत सदस्याच्या अपहरणाच्या संशयावरून शहर पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला. अपहरणाची घटना गुरुवारी घडली. अपहृताने संशयितांच्या तावडीतून सिनेस्टाइल सुटका करून घेतली. 

आवश्य वाचा- 15 जणांचा एकाचवेळी मृत्यु; ट्रक पलटी होवून घडली दुर्घटना
 


साकवद ग्रामपंचायतीची निवडणूक १५ जानेवारीला झाली. दत्तू भिल (वय ५०) सदस्य म्हणून निवडून गेले. त्यांच्या गटाचे अन्य दोघेही निवडून गेले. सात ग्रामपंचायत सदस्य असलेल्या साकवदमध्ये एक उमेदवार दोन प्रभागांतून निवडून गेला. त्यामुळे संख्याबळ तीन विरुद्ध तीन झाल्याने सरपंच-उपसरपंचपदाची निवडणूक कमालीची चुरशीची ठरेल, हे स्पष्ट होते. दत्तू भिल यांच्या भाच्याचा गोंधळाचा कार्यक्रम असल्याने ते गुरुवारी शिरपूरला आले होते. पत्नी तोलाबाई, भाचा दत्तू, भाऊ महादू आदींसोबत दुपारी चारला अरुणावती नदीकाठावर खंडेराव मंदिर परिसरातून जाताना चारचाकी वाहनातून आलेल्या तिघांनी दत्तू भिल यांना बलपूर्वक वाहनात बसवून पळवून नेले. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी शहर पोलिसांना माहिती दिली. शुक्रवारी (ता.१२) सायंकाळी अपहृत दत्तू भिल यांनी पत्नीला फोन करून ते आंबे (ता.शिरपूर) येथील आतेभाऊ रोहिदास भिल याच्याकडे असल्याचे सांगितले. त्यांनी शिरपूर पोलिसांना माहिती दिल्यानंतर उपनिरीक्षक सोनवणे, हवालदार सत्तेसा, मालचे, महाले आदींनी आंबे येथे पोचून दत्तू भिल यांना शिरपूरला आणले. त्यांनी शनिवारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

चौघांचा होता कट 
संशयितांनी अपहरण केल्यानंतर खर्दे रस्ता, महामार्ग, शहादा फाटामार्गे मांडळ (ता. शिरपूर) शिवारातील रिक्रिएशन उद्यानामागे दत्तू भिल यांना नेले. तेथून महामार्गाद्वारे धुळे, मालेगाव येथे वाहनाने चकरा टाकल्या. १२ फेब्रुवारीला संशयित त्यांना घेऊन धुळे येथील लॉजवर पोचले. तेथून सकाळी अकराला मालेगाव व परत शिरपूरला सायंकाळी पाचला घेऊन पोचले. शिरपूरकडून संशयितांनी वाहन खंबाळे (ता. शिरपूर) कडे नेले. तेथे विडी आणण्याचा बहाणा करून दत्तू भिल निसटले. पायी शेतातून, रानातून जात ते आंबे येथील आतेभावाकडे पोचले. 

मतदानापासून वंचित 
तीन विरुद्ध तीन अशी परिस्थिती ग्रामपंचायतीत असल्यामुळे दत्तू भिल यांना मतदान करता येऊ नये या उद्देशानेच त्यांचे अपहरण झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. संशयितांनी त्यांना मारहाण केली नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर त्यांचा अपहरणाचा हेतूही संपुष्टात आल्याचे निष्पन्न झाले. संशयितांच्या आपसांतील चर्चेवरुन भूषण मोरे (रा. शिरपूर), लखन भिल (रा. रामसिंहनगर, शिरपूर), सुनील तथा आप्पा भिवसन भिल (रा. तांडे, ता. शिरपूर) व एक अनोळखी पुरुष गुन्ह्यात सहभागी असल्याचे दिसून आले. त्यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

संपादन- भूषण श्रीखंडे