बालवयात इतके क्रौर्य आले कुठून? 

बालवयात इतके क्रौर्य आले कुठून? 

शिरपूर ः गुन्हेगारीच्या घटना शिरपूरकरांना नव्या नाहीत. उच्च गुणवत्तेच्या शिक्षणासह विविध क्षेत्रांतील दखलपात्र विकासाची उज्ज्वल बाजू आहे, तशी गुन्ह्यांची काळी बाजूही तालुक्याला आहे, पण अंतुर्ली (ता. शिरपूर) येथील सहावर्षीय बालकाचा निर्घृण खून आणि संशयित म्हणून अवघ्या १३ वर्षांचा विद्यार्थी हाती लागणे ही चिंताक्रांत घटना समाजमनावरच आघात करणारी आहे. आयुष्यातील सर्वाधिक निरागस सुखाचा काळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बालवयात इतके क्रौर्य आले तरी कुठून, असा प्रश्न या गुन्ह्यानंतर उपस्थित होत आहे.

 
अंतुर्ली शिवारात शेतमजूर दांपत्याच्या मोहित ईशी या बालकाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना २३ डिसेंबरला घडली. त्यात संशयित म्हणून मृत मोहितचा खेळगडी असलेल्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने ज्याच्या संगतीत कित्येक तास खेळण्यात घालविले, त्या लहानग्या सोबत्याला कायमचे संपविण्याइतका क्रूरपणा आणि नंतर ते कृत्य दडविण्याचा आटोकाट प्रयत्न करण्याइतपत निर्ढावलेपणा इतक्या अल्पवयात कसा आला, ही सर्वांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. 

अस्वस्थ करणारी चलाखी 
घटनाक्रमासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती सुन्न करणारी आहे. आपण केलेल्या प्राणघातक वारांमुळे मोहितचा जीव जाऊ शकतो याबाबत संशयित अजाण होता, असे मानले तर स्वतःच्या शर्टावरील मोहितच्या रक्ताचे डाग पाण्याने धुऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न त्याने केला याला काय म्हणावे? बेपत्ता मुलाचा शोध घेत घटनास्थळाकडे येऊ पाहणाऱ्या मोहितच्या आईला तुमच्या मुलास अनोळखी पुरुष सोबत घेऊन गेला, असे सांगून तिची दिशाभूल करण्याची चलाखी कशी सुचते? दुपारी साडेबाराला मोहितचा मृत्यू झाल्यानंतर तेथून हाकेच्या अंतरावर असलेल्या शेतात सायंकाळपर्यंत पिकाला पाणी टाकत बसण्याइतपत निर्ढावलेपणा अंगी कसा आला? खून करायचा आणि नंतर त्याचा आरोप स्वतःवर येऊ नये, म्हणून धडपड करणे नवीन नाही, पण कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या, शेतकरी कुटुंबातील व सामान्य मानसिक अवस्था असलेल्या अवघ्या १३ वर्षांच्या मुलाने ते करावे ही बाब नक्कीच अस्वस्थ करणारी आहे. 

भीतीमुळे एकाचे आयुष्य संपले 
पोलिसांना माहिती देताना संशयिताने सांगितलेली कारणे पाहिली तर पालकांच्या मानसिकतेवरही प्रकाश पडतो. मृत्यूपूर्वी मोहितने मारहाणीबाबत तक्रार केली असती तर वडिलांनी बेदम झोडपले असते अशी भीती होती, असे संशयित अल्पवयीन मुलाने सांगितले. संशयिताची कौटुंबिक पार्श्वभूमी सर्वसाधारण आहे. दिवसभर शेतात कष्ट करणाऱ्या कुटुंबाच्या प्रमुखाला मुलांविषयी तक्रार आली की त्याला झोडपून शहाणा करणे हा एकमेव पर्याय असावा. त्यामुळे संशयित वडिलांविषयी भीती बाळगून होता. मात्र या भीतीचे पर्यवसान अवघ्या सहा वर्षांचे निरागस आयुष्य संपविण्यात झाले. त्यामुळे सुजाण पालकत्वाच्या धोरणांचा प्रसार शहरापुरता मर्यादित ठेवून चालणार नाही, त्याची ग्रामीण भागातही तितकीच गरज आहे ही बाब अधोरेखित झाली आहे. 

काय करावे लागेल? 
हिंसेचा भडकपणे प्रचार-प्रसार करणाऱ्या माध्यमांच्या तावडीत सापडलेल्या आणि तशा तथाकथित दबंग व्यक्तिमत्त्वाला आदर्श मानण्याचा पायंडा जोपासणाऱ्या उगवत्या पिढीलाही गुन्हा कशाला म्हणतात याची, कायद्याची आणि गुन्ह्याच्या परिणामांची ओळख करून देण्याची नितांत आवश्यकता आहे, अन्यथा गुन्हा पचविणे काही अशक्य नसते असा फिल्मी गैरसमज दृढ करून कोवळी मने गुन्ह्यांच्या पाशात गुरफटत जातील आणि अंतुर्लीसारख्या घटनांची पुनरावृत्ती होतच राहील हे निश्चित आहे. 

 
टीव्हीवरील क्राइमशी निगडित सिरिअल पाहून संशयित १३ वर्षीय मुलाची पर्सनॅलिटी ॲन्टी-सोशल झाली. कमी वयात क्राइमविषयी तो मॅच्युअर्ड झाला, अन्यथा जग पाहिलेले नसताना त्याने पुरावा नष्ट करण्याची चलाखी केली नसती. शिवाय वडिलांची भीती होती. त्याचा परिणाम त्याने सहावर्षीय बालकाचा खून केला. मुलांना अशा सिरिअल पाहू न देणे, त्यांच्यासाठी असलेल्या सिरीअल, चॅनल पाहू देणे, पालकांनीही या ज्वलंत घटनेतून बोध घेणे आवश्‍यक आहे. 
-डॉ. प्रवीण साळुंके, मानसोपचारतज्ज्ञ, धुळे  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com