तपोवनात 7 क्विंटल गांजा हस्तगत गुन्हे शाखेची कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

नाशिक : दोन राज्यांच्या सीमा आणि महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांचा अडथळा पार करीत सुमारे 7 क्विंटल गांजासह नाशिकमध्ये दाखल झालेला आयशर ट्रक नाशिकच्या गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने तपोवन चौकात पकडला. ट्रकचालकाने नाशिक जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पोलिसांना चकविण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. परंतु, दोन दिवसांपासून मागावर असलेल्या पोलिसांनी ट्रक तपोवनात दाखल होताच ताब्यात घेतला. 

नाशिक : दोन राज्यांच्या सीमा आणि महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांचा अडथळा पार करीत सुमारे 7 क्विंटल गांजासह नाशिकमध्ये दाखल झालेला आयशर ट्रक नाशिकच्या गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने तपोवन चौकात पकडला. ट्रकचालकाने नाशिक जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पोलिसांना चकविण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. परंतु, दोन दिवसांपासून मागावर असलेल्या पोलिसांनी ट्रक तपोवनात दाखल होताच ताब्यात घेतला. 

सुमारे 34 लाखांचा गांजा व आयशर ट्रक असा 49 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरचा गांजा नाशिकमध्ये कोणत्या 'मिरची शेठ'कडे जाणार होता त्याची पोलीस चौकशी करीत आहेत. यतिन अशोक शिंदे (35, रा. श्री गणेश अपार्टमेंट, प्रभातनगर, म्हसरुळ), सुनील नामदेव शिंदे (47, रा. मिरचीचे पालखेड, ता. नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट एकचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी यांना दोन दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये मोठयाप्रमाणात गांजा दाखल होणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली परराज्यातील नाशिककडे दिशेने निघालेल्या ट्रकवर पोलिस तांत्रिक माहितीच्या आधारे लक्ष ठेवून होते. त्यानुसार, आयशर ट्रक (एमएच 12 इक्‍यु 1429) मुंबई-आग्रा महामार्गाने नाशिकमध्ये आला आणि तपोवनातील लक्ष्मीनारायण मंदिराकडून जात असता, त्याचठिकाणी सापळा रचून असलेल्या पोलिसांनी ट्रकला अडविले. 

चालकाने ट्रकमध्ये भाजीपाल्याच्या जाळ्या असल्याचे सांगितल्यानंतरही सहाय्यक आयुक्त अशोक नखाते, सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी व त्यांच्या पथकाने ट्रकमध्ये चढले आणि तपासणी केली असता, जाळ्याच्या पाठीमागे सुमारे 680 किलोच्या गांजाच्या गोण्या लपविण्यात आलेल्या होत्या. सुमारे 34 हजार रुपये किमतीचा गांजा आणि 15 लाखांचा ट्रक असा 49 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली. यावेळी उपायुक्त विजयकुमार मगर, माधुरी कांगणे, सहाय्यक आयुक्त अशोक नखाते, मध्यवर्ती गुन्हे शाखेचे कुमार चौधरी उपस्थित होते तर, सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी, सचिन खैरनार, दीपक गिरमे, उपनिरीक्षक बलराम पालकर, जाकीर शेख, पोपट कारवाळ, विजय गवांदे, प्रवीण कोकाटे, अनिल दिघोळे, बाळासाहेब दोंदे, संजय मुळक, वसंत पांडव आदीच्या पथकाने कामगिरी बजावली.

ओरिसातून आणलेल्या गांजाचा ट्रक 
तपोवनात जप्त केला. हा गांजाचा ट्रक ओरिसातून छत्तीसगड, मध्यप्रदेशातील खांडवा मार्गे महाराष्ट्रात दाखल झाला. त्यानंतर जळगाव, धुळे जिल्ह्यातून तो चांदवड टोलनाक्‍यावरून नाशिकच्या दिशेने आला. परंतु पिंपळगाव बसवंत टोलनाक्‍यावरून तो पास झाला नाही. ट्रकचालकाने पोलिसांना चकविताना, ग्रामीण भागातून तो औरंगाबाद रोडने तपोवनात आला. यादरम्यान पोलीसांची ट्रकवर तांत्रिक माहितीच्या आधारे लक्ष ठेवून होते. जप्त केलेल्या ट्रकची नंबरप्लेट (एमएच 12 इक्‍यु 1429) बनावट असल्याने पोलिसांनी सांगितले असून दोघांपैकी एक संशयित यतिन शिंदे ट्रकमालक आहे

नाशिकचा मिरची शेठ कोण?

पंचवटी, भद्रकालीसह परजिल्ह्यातही गांजा पुरविणारा नाशिकचा 'मिरची शेठ' कुख्यात आहे. सदरचा गांजा त्याच्याकडे जाणार असल्याचीच दाट शक्‍यता आहे. आत्तापर्यंतच्या कारवाईत पोलीस या मिरची शेठपर्यंत पोहोचलेले नाहीत. पोहोचले तरी 'जुगाड' होऊन कारवाई ट्रकचालकापर्यंत होऊन थांबते. यावेळी पोलीस 'एमडी' ड्रग्जस्‌प्रमाणे मुख्य संशयितांपर्यंत पोहोचतात का, याकडे आता लक्ष लागून आहे. 

एमडी ड्रग्जस्‌प्रमाणे शहरातील गांजाचे रॅकेट उद्‌ध्वस्त केले जाईल. आज दुपारची कारवाई असल्याने संशयितांच्या चौकशीतून अजूनही बरेच काही हाती येण्याची शक्‍यता आहे. यात कोणाचीही गय केली जाणार नाही. नाशिक अंमलीपदार्थ मुक्त झाले पाहिजे, तोच पोलिसांचा प्रयत्न असेल. 
- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त.

Web Title: Criminal proceedings of 7 Quintal ganja captured in Tapowan