मगरीची आठ पिले, दोन कासवे जप्त

मगरीची आठ पिले, दोन कासवे जप्त

नाशिक - वन्यजीव सप्ताहाच्या आजच्या पहिल्या दिवशी शहर गुन्हे शाखेच्या पथकाने कोकणीपुरा आणि जेलरोड परिसरातून दोघांकडून मगरीची आठ पिले आणि दोन कासवे जप्त केली. दोन्हीही प्राणी हे वन्यजीव संरक्षित अधिसूचीत समाविष्ट असल्याने संशयितांविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फैयाज गयासुद्दीन कोकणी (20, रा. कोकणीपुरा, जुने नाशिक) आणि सौरभ रमेश गोलाईत (20, रा. मराठानगर, जेलरोड) अशी संशयितांची नावे आहेत.

ठाण्याच्या वाइल्ड लाइफ वेल्फेअर असोसिएशनच्या मदतीने नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना तीन दिवसांपूर्वी शहरात मगरीची पिले व कासवे विक्रीसाठी आणण्यात आली असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना कारवाईचे आदेश दिले.

असोसिएशनच्या सदस्यांनी खरेदीदार म्हणून संशयित कोकणी याच्याशी संपर्क साधला. आज दुपारी दीडला खरेदीसाठी ते कोकणीपुऱ्यातील फैयाजच्या घराजवळ भेटले. त्या वेळी संशयित कोकणी याने दोन कासवे आणि मगरीची दोन पिले विक्रीसाठी आणली होती. पोलिसांनी त्यास जेरबंद केले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सौरभच्या बंगल्यावर छापा टाकला. तेथून मगरीची सहा पिले जप्त करण्यात आली.

एका मगरीच्या पिलाची किंमत सुमारे 25 हजार रुपये, तर कासवाची किंमत एक लाखापर्यंत असण्याची शक्‍यता आहे. आसाममधील गोड्या पाण्यातील ही काळ्या रंगाची कासवे आहेत. आसाम, पश्‍चिम बंगालमधील आदिवासींकडून किरकोळ दरात खरेदी करून त्यांची तस्करी केली जाते. कासवे लाभदायक असल्याचा समज असल्याने गेल्या काही वर्षांमध्ये घरात छुप्या पद्धतीने कासव ठेवले जाते. मात्र हे दोन्ही वन्यजीव संरक्षित अधिसूचीमध्ये समाविष्ट असल्याने त्यांना बाळगणे गंभीर स्वरूपाचा अजामीनपात्र गुन्हा आहे.

संशयितांनी वन्यजीव कोठून आणले, कोणाला विकणार होते, याचा तपास सुरू आहे. यापूर्वीही त्यांनी प्राण्यांची तस्करी केली असण्याची शक्‍यता आहे. यासंबंधी वनविभागालाही कळविण्यात आले असून, त्यांच्याकडून स्वतंत्र कारवाई होईल.
- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त, नाशिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com