नाशिककरांची 50 कोटींच्या जीर्ण नोटांवर बोळवण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

नाशिक - नाशिक जिल्ह्यातील तीन बॅंकांमधील रोकड पूर्ण संपली आहे. इतर तीन बॅंकांकडे अत्यल्प रोकड शिल्लक आहे. अशा परिस्थितीत तातडीने नवे चलन उपलब्ध होण्याऐवजी नाशिकमधून यापूर्वी पाठविलेल्या 50 कोटींच्या जीर्ण नोटा पाठवून बोळवण केली जाणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील नोटाटंचाई पुन्हा डोके वर काढणार आहे.

नाशिक - नाशिक जिल्ह्यातील तीन बॅंकांमधील रोकड पूर्ण संपली आहे. इतर तीन बॅंकांकडे अत्यल्प रोकड शिल्लक आहे. अशा परिस्थितीत तातडीने नवे चलन उपलब्ध होण्याऐवजी नाशिकमधून यापूर्वी पाठविलेल्या 50 कोटींच्या जीर्ण नोटा पाठवून बोळवण केली जाणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील नोटाटंचाई पुन्हा डोके वर काढणार आहे.

जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी स्टेट बॅंकेकडे अवघे 310 कोटींचे चलन उपलब्ध होते. त्यामुळे तातडीने अडीचशे कोटी रुपये द्या, अशी मागणी जिल्हा प्रशासनाने केली होती. तेव्हा रिझर्व्ह बॅंकेने शंभर कोटी रुपये देण्याचे मान्य केले होते. शंभर कोटींत भागणार नाही म्हटल्यावर दोनशे कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. त्यासाठी सकाळपासून कंटेनर रिझर्व्ह बॅंकेच्या दारासमोर उभा होता. मात्र, सायंकाळपर्यंत रक्‍कम हाती पडली नाही. शेवटी नाशिक जिल्ह्यातील ज्या दहा, वीस, पन्नास व शंभराच्या जीर्ण झालेल्या जुन्या नोटा यापूर्वी रिझर्व्ह बॅंकेला पाठविल्या होत्या त्याच 50 कोटींच्या नोटा परत घेऊन जा, असा सल्ला देण्यात आला. गरजवंत नाशिकने शेवटी त्या नोटा स्वीकारण्याचे मान्य केले आहे. या नोटा (ता. 17) उद्या मिळणार आहेत.

आजच नाशिकमधील पंजाब नॅशनल, आंध्र, युनियन या बॅंकांमधील नोटा संपल्या आहेत. तेथे सध्या वाटपासाठी चलन नाही. देना बॅंक, बडोदा बॅंकेमध्ये अवघे दोन दोन कोटी रुपये शिल्लक होते. ऍक्‍सिस बॅंकेकडे तीन कोटी 40 लाख, महाराष्ट्र बॅंकेकडे एक कोटी रुपये शिल्लक होते. सर्व बॅंकांकडून अवघे 417 कोटी रुपये निघतील अशी स्थिती आहे. नाशिक महानगराला रोज 25 कोटींची रोकड लागते. ग्रामीण भागात प्रत्येक तालुक्‍यात अडीच ते तीन कोटी रुपये गरजेचे असतात. त्यामुळे 50 कोटींची रोकड रोज दिल्याशिवाय चलनवलन सुरळीत राहत नाही. गेल्या आठवड्यापासून सव्वासतरा कोटी रुपयांच्या पाचशेच्या नव्या नोटा जिल्ह्यात उपलब्ध झाल्या आहेत. त्या ठराविक बॅंकांनाच वाटप झाल्या आहेत. सरकारी बॅंकांनाच पुरेसे चलन मिळत नाही तेव्हा सहकारी बॅंकांची अवस्था आणखी बिकट झाली आहे. पुढील आठवड्यापासून नाताळ सणाची लगबग सुरू होईल. पैशांची गरज भासेल. त्या वेळी चलन उपलब्ध होणे गरजेचे आहे.

Web Title: currency affected