नोटाबंदीविरोधात काँग्रेसतर्फे मोदींच्या पुतळ्याचे दहन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

जळगावमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘रास्ता रोको’; प्रशासनाला दिले निवेदन

जळगाव - केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाने सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेसतर्फे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. यामुळे काही वेळ शहरातील वाहतूक ठप्प झाली होती.

जळगावमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘रास्ता रोको’; प्रशासनाला दिले निवेदन

जळगाव - केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाने सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेसतर्फे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. यामुळे काही वेळ शहरातील वाहतूक ठप्प झाली होती.

पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदी करताना पन्नास दिवसांनंतर लोकांना कोणताही त्रास होणार नाही, अशी ग्वाही दिली होती. मात्र, पन्नास दिवस उलटल्यानंतरही बॅंकेसमोर रांगा आहेत. जनतेला व्यवहार करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे आजच्या स्थितीत सर्वसामान्य व्यक्ती त्रस्त आहे. ‘नोटाबंदी’नंतरची परिस्थिती नियंत्रणात आणण्यास शासन पूर्णपणे असमर्थ ठरले आहे. त्यामुळे काँग्रेसतर्फे आज जळगावात निषेध मोर्चा काढण्यात आला. गांधी उद्यानातील महात्मा गांधींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाचा प्रारंभ झाला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, महानगराध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. राध्येश्‍याम चौधरी, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अविनाश भालेराव आदी उपस्थित होते. मोदी सरकारविरोधी घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्यात आला.

मोदींच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
काँग्रेसचे योगेंद्र पाटील, ॲड. अविनाश भालेराव यांच्या नेतृत्वाखाली संतप्त तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंतप्रधान मोदींच्या पुतळ्याचे दहन केले. मोदींविरोधात त्यांनी घोषणा दिल्या. यावेळी राजू सुवनै, परमेश्‍वर टिकारे, ज्ञानेश्‍वर पाटील, अमोल राजपूत, अजय गवळे, पंकज पाटील, अजय पाटील, बाबा देशमुख, तानाजी पाटील, विजय तंवर आदींनी यात सहभाग घेतला.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नोटाबंदीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. रूबल अग्रवाल निवेदन घेण्यासाठी न आल्याबद्दल कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष राध्येश्‍याम चौधरी, जिल्हाध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आदी यावेळी उपस्थित होते. मोर्चात जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘रास्ता रोको’मुळे वाहतूक ठप्प
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी कार्यकर्ते जात असताना गेट तत्काळ बंद करण्यात आले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊ देण्यास मज्जाव करण्यात आला. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले. जळगाव तालुकाप्रमुख संजय वराडे यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी गेटवर चढून कार्यालय आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी त्यांनी रस्त्यावरच बैठक मारून सरकारविरोधी घोषणा देत रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत कार्यकर्त्यांना रस्त्यावरून बाजूला केले. त्यांनतर वाहतूक सुरळीत झाली.

Web Title: currency ban congress modi's statue of combustion