पारोळ्यात बॅंकेविरोधात ग्राहक महामार्गावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

पारोळा - सकाळपासून रांगेत उभे असलेल्या नागरिकांना अचानक कमी रक्कम देण्याची भूमिका स्टेट बॅंकेने घेतल्याने उपस्थित खातेदारांचा आज संयम सुटला. त्यांचा उद्रेक होऊन रांगेतील शेकडो महिला व पुरुष खातेदारांनी थेट महामार्गावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी मारहाण करून हे आंदोलन उधळून लावले.

पारोळा - सकाळपासून रांगेत उभे असलेल्या नागरिकांना अचानक कमी रक्कम देण्याची भूमिका स्टेट बॅंकेने घेतल्याने उपस्थित खातेदारांचा आज संयम सुटला. त्यांचा उद्रेक होऊन रांगेतील शेकडो महिला व पुरुष खातेदारांनी थेट महामार्गावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी मारहाण करून हे आंदोलन उधळून लावले.

आंदोलनकर्त्यांचा संताप बॅंकेकडून नंतर पोलिसांकडे वळला. त्यामुळे काहीवेळ आंदोलनकर्त्यांनी पोलिसांविरोधातच घोषणाबाजी सुरू केली. शेवटी पूर्वीप्रमाणेच पैसे देण्यास स्टेट बॅंकेच्या व्यवस्थापकांनी होकार दिल्याने खातेदारांचा गोंधळ शमला व महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

नोटबंदीमुळे गेल्या महिन्यापासून शहरातील इतर बॅंकांपेक्षा सर्वाधिक गर्दी स्टेट बॅंकेत होत आहे. बॅंकेतून कधी 24 हजार, तर कधी 12 हजार रुपये अशी रक्कम वेळोवेळी दिली जात आहे. तरीही गर्दी कमी होत नसून, रांगा कायमच आहेत. त्यातच आज सकाळपासून सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, नागरिकांनी बॅंकेबाहेर रांगा लावल्या होत्या. त्यातच अचानक बॅंकेने पैसे कमी असल्याचे सांगून प्रत्येक खातेदारास अवघे पाच हजार रुपयेच देण्याची भूमिका घेतली. त्यास रांगेतील नागरिकांनी विरोध केला. मात्र, तरीही बॅंक व्यवस्थापक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यानंतर उपस्थित स्त्री पुरुषांचा संयम सुटला आणि त्यांनी आरडाओरड करीत राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करून वाहतूक बंद पाडली. दोन्ही बाजूने शेकडो वाहनाचा रांगा लागल्या असताना प्रत्येकी 12 हजार रुपये द्या, अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी लावून धरली.

आंदोलकांचा कल्लोळ
महामार्गावरील आंदोलनावेळीच पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे आपल्या निवासस्थानावरून पोलिस ठाण्याला जात असताना त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मंगरूळ येथील एका आंदोलनकर्त्याला मारहाण केल्याने महिला आंदोलनकर्त्यांची धावपळ उडाली. पोलिसांनी काही एक ऐकून न घेता मारहाण केल्याने आंदोलनकर्ते अधिकच संतप्त झाले. त्यांनी पोलिसांविरोधातच राग व्यक्त करून कल्लोळ सुरू केला. वातावरण अधिकच गंभीर झाले. पोलिसांच्या कृतीमुळे कायदा व सुव्यवस्था गंभीर होण्याची चिन्हे निर्माण झाली. मात्र, सुदैवाने वेळीच मध्यस्थी झाल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रसंगी चोरवडचे विजय पाटील यांनीही पोलिसांच्या मारहाणीला विरोध करून नागरिकांचे म्हणणे निरीक्षक पटारे यांच्यासमोर मांडले.

निरीक्षकांचीच मध्यस्थी
आंदोलकांची भूमिका लक्षात आल्यानंतर निरीक्षक पटारे व विजय पाटील यांनी बॅंकेच्या व्यवस्थापकांना भेटून परिस्थिती जाणून घेतली. बॅंकेत पैसे कमी असल्याने प्रत्येकी पाच हजाराचे वाटप केले जात आहे, असे व्यवस्थापकांनी सांगितले. मात्र, संतप्त जमावाने त्यांचे म्हणणे ऐकून न घेता प्रत्येकी 12 हजार रुपयेच वाटप करा, म्हणून पुन्हा गोंधळ घातला. शेवटी व्यवस्थापकांनी 12 हजार रुपये देण्याचे जाहीर केल्याने हा आंदोलक शांत झाले. मात्र, दोन दिवसानंतर पैसे संपतील असा इशाराही बॅंक व्यवस्थापकांनी दिला, याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले.

Web Title: Customer against the Bank on the highway