दलित अत्याचारास सरकारची मूक सहमती - अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

जळगाव - वाकडी येथे मातंग समाजातील तीन मुलांना मारहाण करण्यात आली. इतर ठिकाणीही दलितांवर अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. सरकार मात्र मूग गिळून गप्प असून, दलितांवरील अत्याचारास त्यांची मूक सहमती आहे, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला.

जळगाव - वाकडी येथे मातंग समाजातील तीन मुलांना मारहाण करण्यात आली. इतर ठिकाणीही दलितांवर अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. सरकार मात्र मूग गिळून गप्प असून, दलितांवरील अत्याचारास त्यांची मूक सहमती आहे, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला.

हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज येथे आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण म्हणाले, की जळगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. हा अतिशय निंदनीय प्रकार असून, सरकार अशा घटना रोखण्यास असमर्थ ठरले आहे. गृहमंत्रालय मुख्यमंत्र्यांकडेच असून, राज्यात क्राइम रेट तब्बल 38 टक्के झाला आहे. गृहमंत्रालयाचे कायदा व सुव्यवस्था राखण्यात कोणतेही नियंत्रण नसल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.

राज्याच्या आर्थिक स्थितीवरून त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले. महाराष्ट्रावर तब्बल पाच लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. ते फेडण्याबाबत सरकारचे कोणतेही नियोजन नाही. राज्यातील शेतकरी, जनतेचे प्रश्‍न सुटलेले नाही; तसेच ते सोडण्याचा प्रयत्नही शासन करीत नाही.

महाराष्ट्राच्या सीमेवरील तेलंगणा, कर्नाटक राज्यात शेतकऱ्यांना; तसेच सर्वसामान्यांना सवलती मिळत आहेत. त्यामुळे राज्यातील लोक त्या राज्यात जाण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. राज्यातील भाजप शासन शेतकरी व जनतेचे प्रश्‍न सोडवू न शकल्याने त्यांच्यावर ही परिस्थिती आली आहे. राज्याचे विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र असा त्रिभाजन करण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला.

वाकडी प्रकरणात मुलांवर झालेल्या अत्याचारप्रकरणी आवाज उठविल्याने शासनाच्या बालहक्क आयोगाने राहुल गांधी यांना पाठविलेल्या नोटीसबाबत चव्हाण म्हणाले, की कॉंग्रेस कायद्याने त्याचे उत्तर देईलच; परंतु ही शासनाची मुस्कटदाबी आहे. विरोधकांनी कोणत्याही प्रश्‍नावर बोलू नये, असा त्यांचा प्रयत्न असून, त्यामुळेच ही नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, कॉंग्रेस त्याला मुळीच घाबरणार नाही.

शिवसेना, मनसे आघाडीत नकोच
देशभरात नवीन होणाऱ्या तिसऱ्या आघाडीबाबत ते म्हणाले, की समविचारी पक्षांची ही आघाडी आहे. भाजपला ही आघाडी निश्‍चितच पराभूत करेल. मात्र यात शिवसेना, मनसे आणि एमआयएमला कॉंग्रेसचा विरोध असेल. याबाबत आम्ही अगोदरच स्पष्ट भूमिका मांडली आहे. या वेळी आमदार अब्दुल सत्तार, जिल्हा प्रभारी विनायक देशमुख, हेमलता पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील, महानगराध्यक्ष अर्जुन भंगाळे, कार्याध्यक्ष डॉ. राध्येश्‍याम चौधरी, माजी आमदार शिरीष चौधरी आदी उपस्थित होते.

Web Title: Dalit atrocities government ashok chavan