महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस दाखविणार दम! 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 12 जून 2018

महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस दाखविणार दम! 

महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस दाखविणार दम! 

जळगाव : महापालिकेत गेल्या अनेक वर्षांत कॉंग्रेसचा एकही नगरसेवक नाही. मात्र आगामी निवडणुकीत यश मिळवायचेच या ध्येयाने पक्षातर्फे तयारी सुरू आहे. अहमदनगरचे विनायक देशमुख यांच्यासोबत सिल्लोड येथील आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे पक्षाने महापालिका निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. 
महापालिका निवडणूक येत्या तीन महिन्यात होत आहे. त्याची तयारी सुरू झाली आहे. कॉंग्रेसला महापालिका निवडणुकीत यश मिळालेले नाही. गेल्या पंधरा वर्षांपासून कॉंग्रेसच्या चिन्हावर एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. त्यामुळे यावेळी कॉंग्रेसने महापालिकेत आपले नगरसेवक असावे, असा चंग बांधला आहे. आगामी निवडणुकीसाठी पक्षाने आक्रमक आणि धडाकेबाज पदाधिकाऱ्यांकडे नेतृत्व द्यावी, अशी मागणी महानगर कार्याध्यक्ष डॉ. राधेश्‍याम चौधरींसह कार्यकर्त्यांनी केली होती. आज मुंबई येथे झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सिल्लोड येथील आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे निवडणुकीच्या प्रभारीपदाची जबाबदारी दिली. नगर येथील विनायक देशमुख जिल्ह्याचे प्रभारी आहेत. त्यांच्या समवेत आता आमदार सत्तारही महापालिका निवडणुकीत पक्षाचे काम करणार आहेत. 

प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत मेळावा 
महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसने आतापासून तयारी सुरू केली आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे 20 जूनला जळगावात येत आहेत. महापालिका निवडणुकीसंदर्भात ते जळगावला पक्षाचा मेळावा घेणार आहेत. त्यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. मुंबईच्या बैठकीत पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील, जिल्हा प्रभारी विनायक देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित आहेत. 

अब्दुल सत्तार आक्रमक आमदार 
अब्दुल सत्तार हे सिल्लोडचे कॉंग्रेसचे आमदार आहेत. राज्याच्या आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री होते. त्यांना महापालिका निवडणुकीचा अनुभवही आहे. 1994 मध्ये सिल्लोड पालिकेचे नगराध्यक्षही होते. पक्षाचे ते धडाकेबाज आमदार आहेत. विशेष म्हणजे त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. सिल्लोड, सोयगाव हा त्यांचा मतदार संघ जळगाव जिल्ह्याच्या सीमेलगत असल्यामुळे शहरातील सर्व क्षेत्रातील व्यावसायिक, उद्योजकांशी त्यांचा संपर्क असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत सत्तार यांचा कॉंग्रेस पक्षाला फायदा होण्याची अपेक्षा आहे. 
 

Web Title: dam