वॉचमनच्या मुलीने मिळवले 97 टक्के      

राजेंद्र बच्छाव
शुक्रवार, 8 जून 2018

सिडकोच्या श्रीमती सरस्वती गुलाबराव पाटील माध्यमिक विद्यालयात तिने दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. अभ्यासातील तिची प्रगती पाहून मुख्याध्यापक मनोज वाकचौरे आणि सुनील बिरारी यांनी जाणीवपूर्वक तिला सेमी इंग्रजी माध्यमाच्या तुकडीमध्ये दाखल केले होते .

नाशिक (इंदिरानगर) : सिडकोच्या उंटवाडीमधील मधुरा पार्क क्रमांक 4 सोसायटीमध्ये वॉचमन असलेल्या कैलास पगारे यांची कन्या मनिषाने आज निकाल जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत 97 टक्के गुण मिळवत इतरांना प्रेरणादायी ठरेल असे यश मिळवले आहे. संपूर्ण मधुरा पार्क येथील रहिवाशांनी तिच्या यशाचा आज आनंद साजरा केला .

सिडकोच्या श्रीमती सरस्वती गुलाबराव पाटील माध्यमिक विद्यालयात तिने दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. अभ्यासातील तिची प्रगती पाहून मुख्याध्यापक मनोज वाकचौरे आणि सुनील बिरारी यांनी जाणीवपूर्वक तिला सेमी इंग्रजी माध्यमाच्या तुकडीमध्ये दाखल केले होते .वडील कैलास हे इमारतीच्या रखवालीसोबत मिळेल त्या वेळेत डॉ. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे कुटुंबाची गरज म्हणून चालक म्हणून देखील काम करतात. तर आई सुनीता मिळेल ते काम करून संसाराला हातभार लावते. मूळचे परभणी येथील हे कुटुंब मनिषाच्या जन्मापासून नाशिकमध्येच स्थायिक झाले आहे .लहान भाऊ असून तोही याच शाळेत आठवीच्या वर्गात शिकतो. सोसायटीमध्ये असलेल्या दहा बाय दहाच्या खोलीमध्ये स्वयं अध्ययन या पद्धतीचा वापर करून तिने यश मिळवले आहे .

संस्थेचे सचिव दत्ता पाटील यांच्या हस्ते तिचा आज सत्कार करण्यात आला. सोसायटीमधील प्रवीणचंद्र भट, सुभाष कुलकर्णी, विलास सोमवंशी आदींसह रहिवासीही उपस्थित होते. डॉ. विजयालक्ष्मी गणोरकर यांनी तिला शिक्षणासाठी मदत केली .शाळेचे शिक्षक सुनील सोनार ,संजय सोनार ,वैशाली गायकवाड, गामने आदींचे तिला मार्गदर्शन लाभले. आता मनिषाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आहे.

Web Title: daughter of watchman got 97 percentage