"दाऊद'च्या नातलगाच्या लग्नात खाकी वर्दीचा पाहुणचार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

नाशिक - कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या मावसभावाच्या मुलाचे दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये धूमधडाक्‍यात झालेल्या लग्न सोहळ्याला काही पोलिस अधिकाऱ्यांनी हजेरी लावल्याची माहिती मिळताच, पोलिस आयुक्तांनी लग्नाचा पाहुणचार घेतलेल्यांची चौकशी सुरू केली. या समारंभाला गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधितांनीही हजेरी लावल्याने त्याची सर्व माहिती वरिष्ठ पातळीवरून मागविण्यात आली आहे. खुद्द पालकमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित होते. 

दाऊद इब्राहिमचे काही नातलग नाशिकमध्ये राहतात. त्यांच्यातील एकाच्या घरी दोन दिवसांपूर्वी अत्यंत दिमाखदार पद्धतीने झालेल्या विवाह सोहळ्यासाठी देशभरातून निमंत्रितांनी हजेरी लावली होती. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसह राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचीही लग्नाला उपस्थिती होती. देशभरातून आलेल्यांत गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित व बुकींची उपस्थिती असल्याची चर्चा आहे. नाशिक पोलिस आयुक्तालयातील एका सहाय्यक पोलिस आयुक्तासह वरिष्ठ पोलिस अधिकारी, उपनिरीक्षक व कर्मचारी अशा डझनभर पोलिसांनी लग्नाला हजेरी लावत पाहुणचार घेतला. या घटनेची माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांना मिळताच त्यांनी चौकशी सुरू केली. हजेरी लावल्यांची नावे आयुक्तांना समजली असून, आता त्यांचे जाबजबाब घेतले जाऊन कोणत्या कारणास्तव ते सोहळ्याला उपस्थित होते, याची माहिती घेतली जात आहे. त्याची दखल वरिष्ठ पातळीवरूनही घेण्यात आली आहे. विशेषत: गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित व बुकींनी हजेरी लावल्याने त्याची माहिती वरिष्ठ पातळीवर कळविली जाणार आहे. त्यामुळे अनेकांना "त्या' विवाह सोहळ्याला जाणे चांगलेच महागात पडण्याची शक्‍यता आहे. 

गुप्तचर यंत्रणेचीही करडी नजर 

या विवाह सोहळ्याला गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी साध्या वेशात हजेरी लावल्याची चर्चा आहे. विवाह सोहळ्याला गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधितांनी हजेरी लावली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यासाठीच गुप्तचर विभागाचीही या सोहळ्यावर करडी नजर होती. 

प्रथमदर्शनी ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी लग्नाला हजेरी लावली त्यांना ती व्यक्ती ही दाऊदची नातलग असावी, याची कल्पना नसावी, असे दिसते. तरीही चौकशी सुरू आहे. संबंधितांचे जाबजबाब घेतले जातील. त्याच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल. 
- डॉ. रवींद्र सिंगल, पोलिस आयुक्त 

Web Title: Dawood's relatives wedding