
Dhule News : 'तो' मृतदेह बाहेर काढण्यात NDRFच्या जवानांना यश
शिरपूर (जि. धुळे) : अपघातग्रस्त टेम्पो ट्रॅक्सला धडक टाळण्याच्या प्रयत्नात तापी नदीत कोसळलेल्या ट्रकमधून चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात शुक्रवारी (ता. २७) राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला (एनडीआरएफ) जवानांना यश आले. मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. (dead body of driver was removed from truck by ndrf that fell into Tapi river trying to avoid hitting accident prone Tempo Trax dhule news)
२३ जानेवारीला रात्री सावळदे (ता.शिरपूर) येथील तापी नदीपुलावर हा अपघात घडला होता. वैजापूरकडून मध्यप्रदेशात मजुरांची वाहतूक करणारी टेम्पो ट्रॅक्स टायर फुटल्यामुळे पुलावर उलटली होती. त्याचवेळी कोल्हापूरहून कोटा (राजस्थान) येथे जाणारा आयशर ट्रक मागून येत होता.
टेम्पो ट्रॅक्सला धडक टाळण्यासाठी चालकाने ट्रक बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. त्यात नियंत्रण सुटून ट्रक तापी नदीत पडला होता. पोलिसांच्या चौकशीनंतर मृत चालक दीपककुमार रुपकिशोर माहेश्वरी (रा.कोटा, राजस्थान) असल्याचे निष्पन्न झाले.
हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा
नदीतील पाण्याची पातळी ५० फूट खोल असल्यामुळे ट्रक बाहेर काढणे अशक्यप्राय होते. प्रारंभीचे दोन दिवस स्थानिक मच्छीमार व नंतर राज्य आपत्ती नियंत्रण पथकाने केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले. दरम्यान २६ जानेवारीला रात्री एनडीआरएफचे पथक शिरपुरात दाखल झाले.
मंडळ निरीक्षक हनुमंत व निरीक्षक संतोष हुले यांच्या नेतृत्वात दिवसभर मोहीम राबवून ट्रकच्या केबिनमधून मृत दीपककुमारचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्याचे नातलग मृतदेह घेण्यासाठी दाखल झाले आहेत.