
Dhule Crime News : ATMची हेराफेरी करणारी टोळी सांगवी पोलिसांकडून गजाआड
शिरपूर : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या वृद्धांचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून फसवणूक करणाऱ्या भामट्यांची टोळी सांगवी पोलिसांनी शिताफीने जेरबंद केली. त्यांच्याकडे विविध बँकांचे तब्बल ९४ एटीएम कार्ड आढळले. (Sanghvi Police arrests a gang of fraudsters who defrauding elderly by changing their ATM cards Dhule crime news)
सांगवी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुरेश शिरसाट यांना २६ जानेवारीला मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर साखर कारखान्याच्या परिसरात मुंबई पासिंग नंबर असलेली स्विफ्ट कार संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसह जाऊन शोध घेतला असता वाहन घटनास्थळी आढळले.
पोलिसांनी चौकशी केली असता संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यासह वाहनाची झडती घेतली. त्यात राष्ट्रीयकृत व खासगी बँकांची एकूण ९४ एटीएम कार्ड आढळली.
संशयितांमध्ये विकी राजू वानखेडे (वय २२, रा.उल्हासनगर), अनिल कडोबा वेलदोडे (वय २९, रा.उल्हासनगर), वैभव आत्माराम महाडीक (वय ३४, रा.शिवाजीनगर, कल्याण), विकी पंडित साळवे (वय ३२, रा.उल्हासनगर) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून पाच मोबाईल, नऊ हजार रुपये रोख व मारुती स्विफ्ट (एमएच ०२, बीझेड ३४३९) असा सुमारे साडेचार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा
संशयितांना जेरबंद करण्याची कामगिरी बजावल्याबद्दल पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय अधिकारी अन्साराम आगरकर यांनी सांगवीचे सहायक निरीक्षक सुरेश शिरसाट, उपनिरीक्षक भिकाजी पाटील, संदीप पाटील, हवालदार संतोष पाटील, जयेश मोरे, इसरार फारुकी, योगेश मोरे, मुकेश पावरा, महामार्ग सुरक्षा पथकाचे हवालदार प्रशांत देशमुख, देवेंद्र वेधे यांचे कौतुक केले.
गुन्हेगार हिस्ट्रीशीटर
संशयितांबाबत माहिती घेतली असता त्यांनी भडगाव, भिवंडी, चाकण, रायगड, तुर्भे, उल्हासनगर, नेरुळ, पनवेल, पेल्हार आदि पोलिस ठाण्यांच्या हद्दीत १२ गुन्हे केल्याचे प्रथमदर्शनी उघडकीस आले. त्यांनी आणखी अनेक गुन्हे केल्याची शक्यता आहे. एटीएममधून रक्कम काढण्यासाठी आलेल्या वृद्ध, ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गंडवून हातचलाखीने कार्ड बदलून गंडा घालण्याची त्यांची कार्यपद्धती आहे.