मायलेक खूनप्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

नाशिक - सातपूरच्या कार्बन नाका परिसरात मायलेकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी घरमालकाचा मुलगा आरोपी रामदास शिंदे यास नाशिकचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी गुरुवारी फाशीची शिक्षा सुनावली. विवाहितेसह सहा वर्षांच्या चिमुकल्याचा निर्घृणपणे केलेला खून हे फाशी देण्यामागील मुख्य कारण असल्याचे न्या. शिंदे यांनी स्पष्ट केले. या वेळी फिर्यादी कचरू संसारे यांनी न्यायालयाच्या निकालाबद्दल, माझ्या मुलींना न्याय मिळाला अशी भावना व्यक्त केली.

आरोपी रामदास शिंदे याने भाडेकरू असलेले कचरू संसारे यांची पत्नी पल्लवी (वय 30) व मुलगा विशाल या दोघांचा 18 एप्रिल 2016 च्या मध्यरात्री निर्घृणपणे खून केला. या घटनेत एकही प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता. मात्र, घटनेनंतर पसार झालेला रामदास शिंदे याने त्याचा मित्र सुभाष राजपूत यास दूरध्वनीवरून संपर्क साधत आपल्या हातून घडलेल्या कृत्याची माहिती दिली होती. हा पुरावा न्यायालयात सादर करताना आधुनिक तंत्रज्ञान "स्पेक्‍टोग्राफी'च्या माध्यमातून तो सिद्ध केला. आरोपी शिंदे याचाच तो आवाज असल्याचे सिद्ध झाले.

परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे न्या. सूर्यकांत शिंदे यांनी आरोपीस दोषी ठरवीत आज फाशीची शिक्षा सुनावली.

स्पेक्‍टोग्राफीच्या आधारे आरोपीची गुन्ह्याची कबुली न्यायालयात ग्राह्य धरली गेल्याने हा दुर्मिळ खटला आहे. त्याद्वारे आरोपीला फाशीची शिक्षा होण्याचा राज्यातील हा पहिला निकाल आहे.
- अजय मिसर, प्रमुख जिल्हा सरकारी वकील

Web Title: Death punishment of the accused