गुजरातकडे पाणी वळविण्याचा शासनाचा डाव हाणून पाडा - दीपिका चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

सटाणा - दमणगंगा, नार - पार नदी अंबिका, आरंगा खोर्‍यातील ५६ दशलक्ष घनफुट पाणी गोदावरी व तापी गुजरात राज्याकडे वळविण्याचा केंद्र व राज्याचा कुटिल डाव असून, याप्रश्नी लक्ष घालून शासनाचा हा डाव हाणून पाडावा. अशी मागणी बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी आज बुधवार (ता. १९) रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

आज सटाणा दौर्‍यावर आले असता राज ठाकरे यांची माजी आमदार संजय चव्हाण यांनी भेट घेऊन या गंभीर प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले. यावेळी दिलेल्या निवेदनात, महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गोदावरी व तापी गिरणा खोर्‍यातील शेतकर्‍यांना मिळाल्यास या परिसरातील पिण्याचा पाण्याचा व शेतीसिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. केंद्र शासनाकडून दमणगंगा, नार - पार नदी अंबिका, आरंगा खोर्‍यातील ५६ दशलक्ष घनफुट पाणी दमणगंगा – साबरमती नदी जोडद्वारे ३५ दशलक्ष घनफुट पाणी गुजरात राज्यातील खंबाट धरणामध्ये व नार – पार नदी अंबिका, आरंगा खोर्‍यातून पार – तापी – नर्मदा नदी जोड प्रकल्पाद्वारे २१ दशलक्ष घनफुट पाणी गुजरात राज्यातील कच्छ, भुज बरोबरच सौराष्ट्रामध्ये सिंचनासाठी वापरण्यात येणार आहे. या कामासाठी गुजरात राज्याला केंद्राकडून १५ हजाऱ कोटी रुपये दिले जाणार आहेत. तसा प्रकल्प अहवाल सुद्धा शासनाने तयार करून दिला आहे. दमणगंगा, नार – पार खोर्‍यातील एक थेंबही पाणी गुजरात राज्याला दिले जाणार नाही. असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात दिले होते. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आपण याप्रश्नी तातडीने लक्ष घालून केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा आणि गुजरात राज्याकडे जाणारे ५६ दशलक्ष घनफुट पाणी गोदावरी व तापी गिरणा खोर्‍यामध्येच वळविण्यासंदर्भात लढा उभारावा असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 

यावेळी माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, पालिकेचे गटनेते काकाजी सोनवणे, दिनकर सोनवणे, पालिकेचे पाणीपुरवठा सभापती राहुल पाटील, कोंग्रेस शहराध्यक्ष किशोर कदम, ज. ल. पाटील, राकेश सोनवणे आदि उपस्थित होते.

Web Title: Defeat the Government of Gujarat to divert water - deepika chavhan