सटाण्यातील उघड्यावरील मांस विक्रीची दुकाने बंद करावीत
सटाणा : सटाणा शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृतरीत्या सर्रास उघड्यावर मांस विक्री होत असल्याने सर्वत्र ओंगळवाणे दर्शन होत आहे. याबाबत पालिका प्रशासन कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
येत्या आठ दिवसात अनधिकृतरीत्या उघड्यावरील मांसविक्रीची सर्व दुकाने त्वरित बंद करावीत, अन्यथा शिवसेना स्टाईलने आम्ही ही सर्व दुकाने बंद करून दाखवु. होणाऱ्या सर्व परिणामांना पालिका प्रशासनच जबाबदार राहील, असा संतप्त इशारा सटाणा शहर युवा सेनेचे अध्यक्ष अमोल पवार यांनी आज सोमवारी (ता.14) निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबत पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे यांना आज दिलेल्या निवेदनात, नाशिक, ताहाराबाद, मालेगाव, चौगाव, नामपूर, मळगाव, कंधाणे, अजमेर सौंदाणे आदी गावाकडून सटाणा शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर पालिका हद्दीत चोहोबाजूला अनधिकृतरीत्या उघड्यावर मांस विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. सुरुवातीला अवघ्या छोट्या स्वरुपात असणाऱ्या या दुकानांचा विस्तार आता वाढला आहे. शहरात बाहेरगावाहून पाहुणा आल्यास प्रथम त्याला टांगलेल्या बोकडाचे दर्शन होते. हे देवमामलेदारांच्या यशवंतनगरीच्या लौकिकास साजेसे नाही. शहरालगत वाहणाऱ्या आरम नदीपात्रालगत थाटण्यात आलेल्या या दुकानांमुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्याही निर्माण झाल्या आहेत. जून महिन्यात पावसाळा सुरु होणार असून उघड्यावरील मांस विक्रीमुळे साथीच्या रोगांना एकप्रकारे निमंत्रणच दिले जात आहे.
ही अनधिकृत उघड्यावरील मांस विक्रीची सर्व दुकाने त्वरित बंद व्हावीत यासाठी वेळोवेळी अनेक पक्ष संघटनांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र त्यावर तात्पुरती कार्यवाही करण्यापलीकडे प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई या दुकानदारांवर केलेली नाही. त्यामुळे संबंधित दुकानदार निर्ढावलेले आहेत.
पालिका प्रशासनाने उघड्यावरील मांस विक्रीची सर्व दुकाने त्वरित बंद करावीत, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता शिवसेना स्टाईलने आम्ही ही सर्व दुकाने बंद करू. त्यानंतर होणाऱ्या सर्व परिणामांना पालिका प्रशासनच जबाबदार राहील असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी दुर्गेश विश्वंभर, जीवन गोसावी, शुभम सोनवणे, मंगेश बगडाणे, अजय भावसार, कल्पेश निकम, गणेश देसले, हेमंत गायकवाड, गणेश धुमाळ, पुष्कर मेणे, विजय गुरव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.