‘त्या’ पोलिस उपनिरीक्षकाच्या चौकशीचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

सटाणा - चिरीमिरी, गुंड आणि माफियांशी असलेल्या सलगीमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सटाणा पोलिस ठाण्यातील ‘त्या’ पोलिस उपनिरीक्षकाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करावेत, असे आदेश मालेगावचे अप्पर पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी दिले आहेत.

सटाणा - चिरीमिरी, गुंड आणि माफियांशी असलेल्या सलगीमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सटाणा पोलिस ठाण्यातील ‘त्या’ पोलिस उपनिरीक्षकाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करावेत, असे आदेश मालेगावचे अप्पर पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी दिले आहेत.

सटाणा पोलिस ठाण्याच्या वादग्रस्त पोलिस उपनिरीक्षकाने आपला वाढदिवस दंगलखोर, तडीपार गुंड आणि माफियांसोबत साजरा केल्याचे फोटो गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. यामुळे पोलिस यंत्रणा आणि गुंड, माफियांमधील संबंध उघडकीस येऊन भ्रष्ट पोलिस यंत्रणेबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मालेगावचे अप्पर पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी वादग्रस्त उपनिरीक्षकाची तात्काळ चौकशी करून त्याचा अहवाल दोन दिवसात सादर करण्याचे आदेश पोलिस उपअधीक्षक सोनाली कदम यांना दिले आहेत. त्या अधिकाऱ्याने कुठे वाढदिवस साजरा केला. तसेच तडीपार गुंड, दंगलखोर, लाकूड तस्कर आणि गुटखा माफिया यांची माहिती सादर करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

संबंधित वादग्रस्त अधिकाऱ्याने ऐन खरीप हंगामात पेरणीच्या वेळी एका बँकेच्या गुन्ह्यात वायगाव (सातमाणे) येथील जाधव दाम्पत्याला अटक केली होती. सुटका करण्यासाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप जाधव दाम्पत्याच्या नातेवाईकांनी केला होता. मागणी पूर्ण करण्यासाठी जाधव दाम्पत्यावर मंगळसूत्र आणि बैलजोडी गहाण ठेवण्याची वेळ आली होती. या गंभीर प्रकाराची ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी त्यावेळी दखल घेत यंत्रणेला फटकारले देखील होते. त्यामुळे त्या अधिकाऱ्याला एका मध्यस्थी मार्फत घेतलेले पैसे परत करावे लागले होते. या प्रकारामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ‘त्या’ अधिकाऱ्याची तात्काळ मालेगाव नियंत्रण कक्षात उचलबांगडी केली होती.

Web Title: demand for inspection for police inspector