
दिल्लीच्या धर्तीवर जिल्हा परिषद शाळांचा विकास करणार - अब्दुल सत्तार
धुळे : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आणखी चांगल्या पद्धतीचे शिक्षण मिळावे यासाठी राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार अनेक दिवसांपासून प्रयत्न करीत होते. दिल्ली निगमच्या शाळांच्या धर्तीवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी मंत्री सत्तार अनेक दिवसांपासून आग्रही होते. यासंदर्भात त्यांनी ग्रामविकास विभागाला प्रस्तावही पाठविला होता. त्यानंतर ग्रामविकास विभागाने यासाठी सात तज्ज्ञांच्या अभ्यास गटाची स्थापना केली असून दिल्लीच्या शैक्षणिक कार्य पद्धतीवर ते अभ्यास करणार आहेत. त्यामुळे मंत्री सत्तार यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे चांगले शिक्षण मिळाले पाहिजे, असा मंत्री सत्तार यांचा मानस होता. कारण ग्रामीण भागातील सर्वसाधारण पालकांना शहरात पाल्यांना शिक्षणासाठी पाठवणे परवडत नाही. त्यामुळे त्यांना ग्रामीण भागातच चांगले शिक्षण मिळावे म्हणून मंत्री सत्तार आग्रही होते.
याचा केला जाणारा अभ्यास
आजच्या स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही प्रगत तंत्रज्ञानासह जगातील सर्व अत्याधुनिक शिक्षण मिळणे गरजेचे आहे. दिल्ली निगमच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी काळानुरूप मोठ्या प्रमाणावर बदल व सुधारणा झाल्या आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता वापरण्यात येणारे तंत्रज्ञान, विद्यार्थी व शिक्षकांकरिता असणाऱ्या सुविधा, विद्यार्थ्यांचे आचार-विचार व शिस्त, शिक्षकांची शिकवण्याची कार्यपद्धती या याचा सखोल अभ्यास तज्ज्ञ मंडळी करणार असून त्याचा अहवाल राज्य सरकारला ते लवकरात लवकर सादर करणार आहेत.
हेही वाचा: मोहेगावनजीक ट्रक व एसटी बसचा अपघात; प्रवासी जखमी
या तज्ज्ञांचा अभ्यास गट
दिल्ली निगमच्या शाळांच्या शैक्षणिक पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी ग्रामविकास विभागाने सात तज्ज्ञांच्या अभ्यास गटाची स्थापना केली आहे. त्यात औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने यांच्या नेतृत्वात औरंगाबाद जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण, फर्दापूर येथील सहशिक्षक काशिनाथ पाटील, नगर जिल्ह्यातील राहाता पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पोपट काळे, औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील सहशिक्षक जगन सुरसे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव कुन्हारी येथील मुख्याध्यापक सुनीलची चिपाटे यांचा समावेश आहे.
हेही वाचा: Ganesh Visarjan 2021 : मालेगावात गणेश विसर्जनासाठी चोख बंदोबस्त
आजच्या स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे याकरिता अनेक दिवसांपासून प्रयत्न करीत होतो. ग्रामविकास विभागाने शासन निर्णय काढल्याने मी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी काहीतरी चांगले काम करू शकलो याचे मला समाधान आहे.
- अब्दुल सत्तार, महसूल व ग्रामविकास, राज्यमंत्री
Web Title: Developing Schools Maharashtra On Backdrop Of Delhi Abdul Sattar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..