डॉ. आंबेडकरांच्या तत्त्वांनुसार जिल्ह्याचा विकास करा - राजकुमार बडोले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

धुळे - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील वास्तू धुळ्यात साकारली याचा मनस्वी आनंद होतो आहे. मात्र, त्याचबरोबर डॉ. आंबेडकरांनी सांगितलेली तत्त्वे व आर्थिक विकासाच्या संदर्भात या इमारतीच्या माध्यमातून या सर्व गोष्टी जिल्ह्यात निर्माण करता येतील, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. 

धुळे - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील वास्तू धुळ्यात साकारली याचा मनस्वी आनंद होतो आहे. मात्र, त्याचबरोबर डॉ. आंबेडकरांनी सांगितलेली तत्त्वे व आर्थिक विकासाच्या संदर्भात या इमारतीच्या माध्यमातून या सर्व गोष्टी जिल्ह्यात निर्माण करता येतील, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. 

मागासवर्गीय घटकांच्या विकासासाठी एकाच छत्राखाली सर्व सोयी-सुविधा देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी अध्यक्षस्थानावरून मंत्री बडोले बोलत होते. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले, रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर कल्पना महाले, आमदार अनिल गोटे, डी. एस. अहिरे, समाजकल्याण आयुक्त पीयूषसिंह, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, समाजकल्याण विभागाचे अपर आयुक्त डॉ. सदानंद पाटील, सहाय्यक आयुक्त के. जी. बागूल, जिल्हा समाजकल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर, आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नूतन इमारतीस भेट देऊन माहिती घेतली.

उद्‌घाटनप्रसंगी श्री. बडोले यांनी इमारत अतिशय सुंदर आणि सुसज्ज असून मागासवर्गीय घटकांच्या विकासासाठी विविध विभाग एकाच ठिकाणी आल्याने नागरिकांना त्याचा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला.

सामाजिक न्याय भवनाची इमारत उभारण्यासाठी सहा कोटी ५५ लाख रुपये खर्च झाला आहे. या इमारतीत विविध महामंडळांची कार्यालये, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांचे कार्यालय, म्युझियम, वाचनालय, सभागृह, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आदी विविध कार्यालये आणि सुविधा आहेत.

कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवतीर्थाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केले. त्यांच्या समवेत श्री. बडोले व श्री. रावल उपस्थित होते.

Web Title: Development of the district according to dr. ambedkar's principles