देविदास पिंगळे यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आर्थिक अपहाराप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने सभापती व माजी खासदार देविदास पिंगळे यांना दहा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यावेळी पिंगळे यांच्यातर्फे वैद्यकीय उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल होण्यासाठीचा अर्ज सादर करण्यात आला, मात्र न्यायालयाने सदरचा अर्ज फेटाळून लावत मध्यवर्ती कारागृहातही वैद्यकीय उपचार होऊ शकतो, असे स्पष्ट केल्याने अखेर पिंगळे यांना मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व माजी खासदार यांना गेल्या 21 तारखेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने 25 तारखेपर्यंत पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. आज मुदत संपल्याने दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश श्रीमती सुचित्रा घोडके यांच्यासमोर हजर करण्यात आले. यावेळी सरकारी पक्षाने पिंगळे यांच्या कोठडीची मागणी केली तर बचाव पक्षाने एकाच कारणासाठी पिंगळे यांना पुन्हा कोठडी देण्यात येऊ नये असा युक्तिवाद केला.

सुमारे अडीच तास चाललेला युक्तिवाद, न्यायालयाने सदरील प्रकरणाचा संपूर्ण तपशील मागवून घेत त्यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे असलेल्या पुराव्यांची शहानिशा करून अखेर सरकारी पक्षाची कोठडीची मागणी फेटाळून लावत पिंगळे यांना दहा दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली. याचवेळी बचावपक्षातर्फे पिंगळे यांना मधुमेह व अपघात झाल्याने पायाला झालेली दुखापत यामुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचा अर्ज सादर केला. त्यावर न्यायालयाने, मध्यवर्ती कारागृहातही वैद्यकीय उपचार होऊ शकतात. त्यांच्याकडे यावर उपचार नसेल तर तसा त्यांचा अहवाल सादर केल्यानंतर अन्य रुग्णालयात दाखल करण्यासंदर्भात उपचार होऊ शकेल असा निर्णय देत सदरचा अर्ज फेटाळून लावला.

Web Title: devidas pingle shifted to central jail