कर्जमुक्तीशिवाय स्वस्थ बसणार नाही - उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

धरणगाव - सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली आहे. मात्र, अद्यापही त्यांच्या पदरात काहीही पडलेले नाही. त्यामुळे शिवसेना आता जागल्याचे काम करणार आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होऊन पूर्ण कर्जमुक्ती झाल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे बुधवारी शेतकरी संवाद मेळाव्यात दिला. शेतकऱ्यांना नडणाऱ्या बॅंकांना शिवसेना "स्टाइल' दाखविण्यात येईल, असा दमही त्यांनी भरला.

उद्धव ठाकरे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. धरणगाव येथे आज शेतकरी संवाद मेळाव्यात ते म्हणाले, की शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची घोषणा सरकारने केली. शिवसेना त्याबाबत आनंदी आहे. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. शेतकऱ्यांना तातडीने पेरणीसाठी दहा हजार रुपये देण्यात येणार होते. तेसुद्धा त्यांच्या पदरात पडलेले नाहीत. त्यामुळे शिवसेना आता कर्जमुक्ती होईपर्यंत पाठपुरावा करणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेप्रमाणे आम्ही अगदी 89 लाख शेतकऱ्यांना खरोखरच लाभ झाला की नाही, हे पाहण्यासाठी बॅंकांकडून यादी घेऊन घरोघरी जाऊन लाभार्थी शेतकऱ्यांची तपासणी करणार आहोत.

दहा हजारांचा प्रश्‍न मंत्रिमंडळात
शेतकऱ्यांना दहा हजार रुपये देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेबाबत ते म्हणाले, की पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. त्यामुळे त्यांना दहा हजार रुपये तातडीने देण्यात यावेत, यासाठी आमचे मंत्री दिवाकर रावते मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रश्‍न उपस्थित करतील.

विखे पाटलांचे भाजपशी साटेलोटे
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले, की विरोधी पक्षनेता असतानाही ते सरकार आपल्याला घरच्यासारखे वाटते म्हणतात. सरकारला आपले म्हणणारे हे कसले विरोधी पक्षनेते? भाजप सरकारशी त्यांचे साटेलोटे आहे. शिवसेना मात्र अशा पद्धतीचे राजकारण चालू देणार नाही.

"शिवसेना स्टाइल' दाखविणार
शेतकऱ्यांना प्रत्येक बॅंकेने कर्ज दिले पाहिजे, ज्या बॅंका शेतकऱ्यांना नडतील, त्यांना "शिवसेना स्टाइल' दाखविण्यात येईल. शिवसैनिकांनी आता बॅंकेसमोर टेबल खुर्ची टाकून बसावे, असा आदेशही त्यांनी दिला. या वेळी व्यासपीठावर पर्यावरणमंत्री रामदास कदम, परिवहनमंत्री दिवाकर रावते, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार नीलम गोऱ्हे आदी उपस्थित होते.

पवारांच्या तोंडात भ्रष्टाचाराचा बोळा
अजित पवार यांनी शिवसेनेला दुतोंडी गांडूळ संबोधल्याचा ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. 'गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. मात्र, पवारांना किती तोंडे आहेत हे त्यांनीच सांगावे. उपमुख्यमंत्री असताना ज्या तोंडाने त्यांनी शेतकऱ्यांची अवहेलना केली होती, त्याच तोंडाने ते राज्य सरकारविरुद्ध आवाज का उठवीत नाही? त्यांच्या तोंडात भ्रष्टाचाराचा बोळा कोंबला असल्यानेच ते बोलत नसावेत,'' अशी टीका ठाकरे यांनी केली.

Web Title: dharangav jalgav news Without a debt, you will not get fit