आम्हालाही मारून टाका, ‘त्यांना’ फासावर लटकवा!

पिंपळनेर - साक्री रोडवरील मुक्कामस्थळी सोमवारी न्यायाची याचना करताना पीडित महिला. शेजारी मृत व्यक्तींचे पीडित कुटुंबीय.
पिंपळनेर - साक्री रोडवरील मुक्कामस्थळी सोमवारी न्यायाची याचना करताना पीडित महिला. शेजारी मृत व्यक्तींचे पीडित कुटुंबीय.

मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांचा टाहो; पुढे कसे जगावे हेच समाजाने समजून सांगावे
पिंपळनेर - आम्हालाही आता मारून टाका... आमचे कुंकू पुसणाऱ्या, पोरके करणाऱ्यांना फासावरच लटकवा... कर्ते पुरुष गेल्याने आमचे, लेकुरवाळ्यांचे पुढे कसे होईल..? आम्ही कुणाच्या आशेवर जगायचे..? काय करायचे या प्रश्‍नांची उत्तरे समाजाने आम्हाला द्यावीत... आमचा संसार उघडा पाडणाऱ्यांचे भले होणार नाही.... हाच त्यांना शाप आहे....अशा संतप्त भावना प्रकट करत मृत पाच जणांच्या पत्नी, कुटुंबीय, नातेवाइकांनी अश्रूंना वाट करून दिली. त्यावेळी निर्माण झालेल्या भावनाविवश स्थितीमुळे अनेकांची मने हेलावली.  

राईनपाडा हत्याकांडातील मृत पाच जणांच्या पीडित कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते. ते येथील साक्री रोडवर पाल टाकून राहत होते. त्यांच्या मुक्कामाविषयी त्यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्याला अवगत केले होते.

त्यांच्याकडे भिक्षेकरी असल्याचे सरकारी यंत्रणेचे प्रमाणपत्र व ओळखपत्र होते. नाथपंथी डवरी समाजातील आणि ठिकठिकाणी भिक्षा मागून चरितार्थ चालविणारी, जगणारी पीडित कुटुंबे राईनपाड्यातील हत्याकांडानंतर सुन्न झाली. 

उपस्थितही भावनाविवश 
पिंपळनेरपासून ३० किलोमीटरवर रविवारी (ता. १) राईनपाडा येथे मुले पळविणाऱ्या टोळीच्या संशयावरून भारत माळवे, दादाराव भोसले, भारत भोसले, अग्नू इंगोले, राजू भोसले यांना हिंसक जमावाने ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवत क्रूरतेने ठेचून मानले. मानवजातीला कलंक ठरलेल्या या घटनेनंतर पीडित कुटुंबीयांनी केवळ अश्रूंवर दोन दिवस जागून काढले. या कुटुंबीयांच्या भेटीसाठी गेलेले प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही निःस्तब्ध झाले. एकूणच स्थिती पाहून सारे भावनाविवश झाले. 

केवळ आक्रोश  
मृत पाच जणांचे मृतदेह पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात २६ तास पडून होते. विविध मागण्यांची तड लागेपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, असा पवित्रा पीडित कुटुंबीयांसह नातेवाइकांनी घेतला होता. रुग्णालयासह पीडित कुटुंबीयांच्या मुक्‍कामस्थळी केवळ आक्रोश, अश्रूंच्या धारा वाहत होत्या. महिला वर्ग अनेकांच्या सांत्वनानंतरही सावरत नव्हत्या. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन लवकर अंत्यसंस्कार करावेत, अशी समजूत काढण्याचा प्रयत्न महसूल, पोलिस यंत्रणेचे अधिकारी संयुक्तपणे करीत होते. मात्र, मागण्यांच्या पूर्ततेशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका पीडित कुटुंबीयांनी कायम ठेवली. शेवटी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे व सहकारी घटनास्थळावरून रवाना झाले. त्यांनी आमदार डी. एस. अहिरे, अन्य महसुली, पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुपारी पावणेचारला मागण्या मान्यतेविषयी लेखी पत्र सुनील भोसले, समाजाचे अध्यक्ष मारुती भोसले व पीडितांच्या शिष्टमंडळाला दिले आणि संबंधितांनी मृतदेह ताब्यात घेतले. या कालावधीतील आक्रोश उपस्थित सर्वांचे मन सुन्न करणारा होता. 

‘मीडिया’ने न्याय मिळवून द्यावा
आम्हालाही आता मारून टाका, ‘त्यांना’ फासावर लटकवा. प्रसारमाध्यमे आता आमचे मायबाप असून त्यांनी न्याय मिळवून देण्यासाठी पाठबळ द्यावे. आमच्या मुलाबाळांचे कसे होईल, आम्ही कसे जगायचे, कर्ता पुरुषच गेल्यावर आम्ही अनाथ झालो आहोत, आमचे भवितव्य काय, असा भावनिक प्रश्‍न मृत राजू भोसले यांच्या पत्नीसह इतर पीडित महिलांनी उपस्थित केला. या प्रसंगामुळे गर्दी स्तब्ध झाली होती.   

वाहनांनी गावाकडे रवाना
दोन रुग्णवाहिकांमध्ये पाच मृतदेह आणि दोन मिनीट्रकमध्ये पीडित कुटुंबीयांचे उरलासुरला संसार टाकल्यानंतर त्यांच्यासह नातेवाईक दुपारी चारला मंगळवेढ्याकडे रवाना झाले. पिंपळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते भटू पवार, रोहिदास पगारे, युनूस तांबोळी, प्रकाश साळवे, युनूस खाटीक आदींनी पिंपळनेरमधून पंधरा हजारांहून अधिक मदत संकलित करून आणि पोलिसांनीही पुढाकार घेत पीडितांना गावाकडे जाण्यासाठी योग्य ती मदत केली. 

जिल्हाधिकाऱ्यांची अपेक्षा
पीडितांनी सरपंच, हिंसक जमावातील क्रूर कृत्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी यापुढे सोशल मीडियावर बारकाईने नजर ठेवून योग्य ती कार्यवाही केली जाईल, त्यासाठी पत्रकारांनी मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

वीस जण पोरके
पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर अवलंबून असणारे वीस जण पोरके झाले. यात मृत भारत भोसले यांची पत्नी, मुलगा, चार मुली, मृत भारत माळवे यांची पत्नी, चार मुलगे, दोन मुली, दादाराव भोसले यांची पत्नी, राजू भोसले यांची पत्नी, मुलगा, चार मुली यांचा समावेश आहे. अग्नू इंगोले हे अविवाहित होते.

भुसे, महाजनांकडून मदत 
धुळे येथील सामाजिक कार्यकर्ते उमेश महाजन, प्रशांत बागूल यांनी पीडित कुटुंबीयांना पंधरा हजार रुपयांची मदत दिली. पालकमंत्री दादा भुसे यांनी पाच लाखांची आर्थिक मदत जाहीर केली. यातून माणुसकीचा झरा आटला नसल्याचे दिसून आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com