मारहाणीच्या क्‍लिपनेच ठरणार दिशा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

साक्री - राईनपाडा (ता. साक्री) येथे झालेल्या भिक्षेकऱ्यांच्या हत्येच्या तपासासाठी मारहाणीची क्‍लिप तसेच संशयितांचे मोबाईल जप्त करायचे आहेत. तपासातील तेच महत्त्वाचे दुवे असल्याचे सांगत संशयितांना सात दिवसांची पोलिस कोठडीची मागणी आज सरकार पक्षातर्फे करण्यात आली. त्यावर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. एस. वानखेडे यांनी सर्व २३ संशयितांना सहा जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

साक्री - राईनपाडा (ता. साक्री) येथे झालेल्या भिक्षेकऱ्यांच्या हत्येच्या तपासासाठी मारहाणीची क्‍लिप तसेच संशयितांचे मोबाईल जप्त करायचे आहेत. तपासातील तेच महत्त्वाचे दुवे असल्याचे सांगत संशयितांना सात दिवसांची पोलिस कोठडीची मागणी आज सरकार पक्षातर्फे करण्यात आली. त्यावर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. एस. वानखेडे यांनी सर्व २३ संशयितांना सहा जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

भिक्षेकऱ्यांच्या हत्याकांड प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या २३ संशयितांना येथील न्यायालयात आज हजर करण्यात आले होते. राईनपाडा येथे जमावाने मुले पळविणारी टोळी समजून नाथपंथी डवरी समाजाचे भिक्षेकरी दादाराव भोसले, राजू भोसले, भारत भोसले, भारत माळवे, अप्पा इंगोले या पाचही जणांना बेदम मारहाण करत त्यांची हत्या केली होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कालच २३ संशयितांना ताब्यात घेतले होते. 

या संशयितांमध्ये राजू सुकाराम गवळी (कोकणी, वय २२, रा. सावरपाडा, ता. साक्री), सुकलाल धोंडू कांबडे (३९, रा. राईनपाडा), राजाराम तुळशीराम राऊत (४५, रा. राईनपाडा), सुरज्या देहल्या भवरे (भिल, ३८, रा. राईनपाडा), काळू सोमा गावित (२५, रा. राईनपाडा), चुनीलाल झग्या माळीच (४०, रा. राईनपाडा), गोटीराम मोतीराम चौधरी (३५, रा. करंझटी), गोट्या अप्पा बिऱ्हाडे (२२, रा. आमळी), गोपाल मगर कुवर (भिल, २०, रा. माळपाडा), किरण पंडव राऊत (२३, रा. करंझटी), सुक्राम दामू कांबळे (५८, रा. काकोडपाडा), गोविंदा जंगलू देशमुख (३४, रा. जामतलाव), प्रवीण जयदास राठोड (२५, रा. सातारपाडा), बंडू पवळू साबळे (४२, रा. जामूनपाडा), मिथुन रणजित राठोड (२३, रा. सातारपाडा), गुलाब बत्त्या गायकवाड (३२, रा. खरटीपाडा), गजमल सदा मालुसरे (३२, रा. शिरसोली), शांताराम उलीराम गायकवाड (२६, रा. बांडीकुहेर), किशोर छोटीराम पवार (१८, रा. सुतारे), अजित नवश्‍या गांगुर्डे (१९, रा. सुतारे), सिद्धार्थ दिलीप गांगुर्डे (१८, रा. सुतारे), मोतीलाल काशिराम साबळे (१९, रा. निळीगोटी), दिलीप रमेश गांगुर्डे (२४, रा. सुतारे) यांचा समावेश आहे. त्यांना आज तपासाधिकारी तथा धुळे ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे यांनी न्यायालयात हजर केले.

सरकार पक्षाकडून युक्तिवाद
सरकार पक्षाकडून युक्तिवादात ॲड. डी. आर. जयकर म्हणाले, की हत्याकांडात वापरण्यात आलेली हत्यारे, मारहाणीचे व्हीडीओ रेकॉर्डिंग करण्यासाठी वापरण्यात आलेले मोबाईल जप्त करण्यासाठी व ताब्यात असलेल्या संशयितांच्या चौकशीसाठी सात दिवसांच्या पोलिस कोठडी देण्यात यावी. यावर संशयितांतर्फे ॲड. मनोज खैरनार व ॲड. मोहन साळुंखे यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले, की राईनपाडा येथील हत्याकांडानंतर पोलिसांनी धरपकड करताना काही निरपराध व्यक्तींनाही पकडले असण्याची शक्‍यता आहे. यातील संशयित आरोपी प्रवीण राठोड व मिथुन राठोड हे शेजारील गावांतील रहिवासी असून, ते केवळ आठवडे बाजारात आले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना केवळ चौकशीसाठी म्हणून बोलावले व त्यांना ताब्यात घेत यात गोवले जात आहे.

यावर न्यायालयाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून संशयितांना सहा जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सर्व संशयितांना साक्री पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.

सर्व संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. संशयितांनी वापरलेले साहित्य जमा करणे सुरू आहे. राईनपाड्यातील ग्रामस्थ फरार झाले असून, व्हीडीओ रेकॉर्डिंगमधील चेहरे तपासातून या प्रकरणातील अन्य संशयितांचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळी एक डीवायएसपी, एक पोलिस निरीक्षक, नऊ ते दहा पोलिस कर्मचारी, एक आरसीपी तुकडी तैनात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता ठेवावी. सोशल मीडियातून अफवा पसरविणारे मेसेज पुढे पाठवू नयेत.
- श्रीकांत घुमरे, तपासाधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी, धुळे ग्रामीण

Web Title: dhule aamli rainpada hatyakand video clip crime police