धुळे: भाजपतर्फे राज्यभरात रक्षाबंधन सणानिमित्त ‘आमचा देवा भाऊ राखी संकलन’ उपक्रम राबविण्यात आला. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपाख्य देवाभाऊ यांच्यासाठी तब्बल १ लाख ७१ हजार राख्यांचे संकलन आणि पत्रलेखनातून धुळे जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. अशा मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मुख्यमंत्री फडणवीस हेही खूश झाले. या यशाबद्दल मुंबईत दिमाखदार सोहळ्यात शनिवारी (ता. २३) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे यांचा प्रमाणपत्रासह गौरव करण्यात आला.