धुळे- ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२४-२५’ मध्ये धुळे शहर देशपातळीवर ३९ व्या स्थानी आले खरे; पण यावर आता शहरातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य असताना थेट देशपातळीवर ३९ वे स्थान कसे? असा प्रश्न आहे. अर्थात, यापूर्वीही अशा निकालांवर आश्चर्य व्यक्त झाले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना शहरात कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत असतील, तर ते या ‘स्वच्छता रँकिंग’वर प्रश्नचिन्ह उभे करणार आणि राजकीय पक्ष त्याचे भांडवल करणार, हे निश्चित! ही स्थिती पाहता स्वच्छ सर्वेक्षणाच्या परीक्षेत महापालिका पास होत असली, तरी प्रत्यक्ष तसे स्वच्छ चित्र उभे करण्यात अपयशी ठरत आहे.