
Dhule News : येत्या पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सोमवारी मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक झाली. यावेळी श्री. गोयल बोलत होते. ( Prepare disaster management action plan )
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले, येत्या पावसाळ्यातील आपत्तीच्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक शासकीय विभागाने समन्वयातून कामे करावीत.
नदी, नाले काठावरील अनधिकृत बांधकामे संबंधित यंत्रणांनी तातडीने हटवावीत. स्थानिक स्वराज्य संस्थांनी अग्निशमन यंत्रणा तत्पर ठेवावी. जुन्या, पडक्या इमारतींची पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी. शासकीय इमारतींचे फायर ऑडिट करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा.
वेळेत कामे पूर्ण करा
मान्सूनपूर्व रस्ता दुरुस्ती, गटार व नालेसफाई, विद्युत दुरुस्तीची कामे वेळेत करावी. कार्यालयप्रमुखांनी पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये. सर्व संबंधित विभागांनी नियंत्रण कक्ष स्थापन करावे आणि त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी. धोकादायक ठिकाणांची निश्चिती करून तेथे सूचना फलक लावावेत. धरणनिहाय संपर्क अधिकारी नियुक्त करावी. (latest marathi news)
कृषी विभागाने हवामान खात्याकडून येणारा इशारा तात्काळ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने झाडे पडून बंद पडलेले रस्ते तातडीने सुरू करण्यासाठी गस्ती पथके तैनात करावीत. माती, मुरुमाचे ढिगारे काढण्यासाठी साधनसामग्रीची उपलब्धता करून द्यावी.
औषधे, धान्य उपलब्ध करा
पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहावे. पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून घ्यावा. शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल, असे नियोजन करावे. सर्पदंश प्रतिबंधक लसीचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. जिल्हा पुरवठा विभागाने दुर्गम भागात अन्नधान्य वितरणाचे नियोजन करावे. आपत्ती काळात वीज पुरवठा खंडित झाल्यास वीज वितरण कंपनीने तो पूर्ववत करण्यासाठी विशेष पथके गठित करावीत.
नियंत्रण कक्ष, धरण, पाणीपुरवठा योजना, शासकीय कार्यालयांचा वीजपुरवठा सुरळीत आणि अखंड सुरू राहील याची खबरदारी घ्यावी. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत विभागाने शहरातील अनधिकृत होर्डीग्जवर कारवाई करावी. महानगरपालिका व नगरपालिकेने शहरातील नालेसफाईबाबत आढावा घ्यावा व कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण द्यावे.
निवासी उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गावंडे यांनी आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची पीपीटीद्वारे सविस्तर माहिती दिली. बैठकीस सर्व तहसीलदार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, भारत संचार निगम, पोलिस विभाग, पाटबंधारे विभाग, आरोग्य, कृषी, राज्य आपत्ती प्रतिसाद दल आदींसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.