
Dhule Marathon News : अंध विद्यार्थिनी धावल्या अन् जिंकल्या!
धुळे : येथील पोलिस कवायत मैदानावर रविवारी (ता. ५) झालेली जिल्हास्तरीय धुळे मॅरेथॉन स्पर्धा-२०२३ ही अनेक अंगाने वैशिष्ट्यपूर्ण ठरली. यात प्रथमच नऊ अंध विद्यार्थिनी आत्मविश्वासाने धावल्या आणि उपस्थित सर्वांची मने जिंकूनही गेल्या.
तसेच जिल्हाधिकारी जलज शर्मा दहा किलोमीटर धावले आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, आदिवासी प्रकल्प अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत स्टेजवर सादर केलेला डान्स आकर्षण ठरला. (Dhule marathon Blind students ran and won Dhule Sports News)
अंधांसाठी येथे नॅब संस्था कार्यरत आहे. धुळे शहरात मॅरेथॉन स्पर्धा होत असून, आरोग्यहितासाठी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयात एका कार्यक्रमाद्वारे केले.
त्या वेळी विद्यावर्धिनी संस्थेचे पदाधिकारी व नॅबचे सचिव अक्षय छाजेड यांनी अंध विद्यार्थ्यांचा मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदविला तर चालेल का, अशी विचारणा केली. त्यावर प्रेरणा देत श्री. बारकुंड यांनी अंध विद्यार्थ्यांचा स्पर्धेत हमखास सहभाग नोंदवू, अशी ग्वाही देताना उत्साह वाढविला.
हेही वाचा: प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली
आम्हीही धावून दाखवू...
या पार्श्वभूमीवर नॅबचे अध्यक्ष डॉ. प्रकाश चौधरी, सचिव छाजेड यांनी मॅरेथॉन स्पर्धेत सहभागासाठी उत्सुक नऊ अंध विद्यार्थिनींना सराव देण्यास सुरवात केली. भारताचा अंध खेळाडूंचा संघ अंधांच्या क्रिकेट स्पर्धेत विश्वकंरडक जिंकू शकतो, तर अंध विद्यार्थी मॅरेथॉन स्पर्धेत का धावू शकत नाही, असा आत्मविश्वास दर्शवत नऊ अंध विद्यार्थिनींनी स्पर्धेपूर्वी चार दिवस सरावाला सुरवात केली.
देशात मॅरेथॉन स्पर्धेत अंधांचा सहभाग झाल्याचे किंवा तो करून घेतल्याचे दिसलेले नाही. त्यामुळे धुळे मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवून श्री. बारकुंड यांच्या प्रेरणेने अंध विद्यार्थिनी धावतील, असा आम्हा सर्वांमध्ये आत्मविश्वास दुणावला, असे श्री. छाजेड यांनी सांगितले.
आम्ही सर्वांसोबत धावून दाखवू आणि स्पर्धेतील ‘फिट धुळे...हिट धुळे’चे घोषवाक्य यशस्वी ठरवू, अशा निश्चयाने वय वर्षे १४ वरील अंध विद्यार्थिनी शीतल शिवजी डोळस, मोनिका सुरेश पवार, प्रतिभा भीमराव पवार, वैशाली नारायण बोरसे, सुवर्ण धनराज वाघ, भागा बापू ठेलरी, रामचंद्र दयाराम पाटील, देवयानी रामचंद्र पाटील यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.
...अन् त्यांनी मने जिंकली
नऊ अंध विद्यार्थिनींनी ग्रुपमधील एका अंशतः अंध विद्यार्थिनीचाच हात पकडून तीन किलोमीटरच्या फॅमिली रनमध्ये धाव घेतली व स्पर्धा पूर्ण केली. तसेच अंध शिक्षक रामचंद्र पाटील यांनीही डोळस व्यक्तीचा हात पकडून धावत स्पर्धा पूर्ण केली. अशी ही जिद्द पाहून श्री. बारकुंड हेही भारावले. त्यांनी या अंध स्पर्धकांना कौतुकाची थाप दिली.
स्पर्धेतील वेगळे आकर्षण
मॅरेथॉन स्पर्धेसाठी खुद्द जिल्हाधिकारी जलज शर्मा अन्य स्पर्धकांप्रमाणे रिपोर्टिंगसाठी रविवारी पहाटे पाचला पोलिस कवायत मैदानावर उपस्थित झाले. त्यांनी दहा किलोमीटर स्पर्धेसाठी नोंदणी केली होती. पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार जयकुमार रावल यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर जिल्हाधिकारी शर्मा यांनी मैदानापासून बारापत्थर चौक, छत्रपती शिवाजी पुतळा, तेथून आग्रा रोडमार्गे देवपूरमधील दत्तमंदिर, जिल्हा क्रीडासंकुलाजवळून यू-टर्न घेत पुन्हा मैदानावर परतत दहा किलोमीटरची स्पर्धा पूर्ण केली.
यापाठोपाठ सहाय्यक जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मैदानावरील स्टेजचा ताबा घेतला. उपस्थित मान्यवरांना गुंतवून ठेवण्यासाठी वॉर्म-अप सेशन, झुम्बा डान्स सुरू होता. त्या वेळी प्रांताधिकारी धोडमिसे यांनी झुम्बा डान्स करत असलेल्या ग्रुपमध्ये सहभाग घेत ठेका ठरला. त्या वेळी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना उपस्थित मान्यवरांसह प्रेक्षकांनी दाद दिली. त्या उत्कृष्ट नर्तिकाही आहेत.