तिसऱ्या दिवशीही फक्त "आश्‍वासन'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

धुळे - प्रलंबित मागण्यांसाठी तीन दिवसांपासून फिरणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या पदरी आजही "उद्या'चे आश्‍वासन मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होत असल्याचे चित्र आहे. मागण्यांवर आयुक्तांशी चर्चाच होत नसल्याने गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेत आंदोलनाचे वातावरण आहे. उद्या (ता. 16) तोडगा निघाला नाही तर आंदोलन निश्‍चित आहे.

धुळे - प्रलंबित मागण्यांसाठी तीन दिवसांपासून फिरणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या पदरी आजही "उद्या'चे आश्‍वासन मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होत असल्याचे चित्र आहे. मागण्यांवर आयुक्तांशी चर्चाच होत नसल्याने गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेत आंदोलनाचे वातावरण आहे. उद्या (ता. 16) तोडगा निघाला नाही तर आंदोलन निश्‍चित आहे.

चलनातून बाद पाचशे, हजारांच्या नोटांतून कर भरण्याची संधी दिल्यानंतर महापालिकेच्या तिजोरीत 15 कोटी रुपये जमा झाले. या रकमेतून पाचवा, सहावा वेतन आयोगाचा फरक द्यावा, महागाईभत्ता फरक मिळावा, दोन वर्षांपासून मंजूर बाराशे रुपये वैद्यकीयभत्ता द्यावा, रोजंदारी कर्मचाऱ्यांना फरक द्यावा, अशा कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत. किमान सहा कोटी रुपये यासाठी खर्च करावेत, असा कर्मचाऱ्यांचा आग्रह आहे.

तीन दिवसांपासून चर्चाच नाही
13 डिसेंबरला कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसमोर भूमिका मांडली. त्याच दिवशी आयुक्त संगीता धायगुडे यांच्याशी चर्चा अपेक्षित होती. मात्र, धायगुडे उपस्थित नसल्याने चर्चा होऊ शकली नाही. कालही धायगुडे अन्य बैठकीत व्यस्त असल्याने कर्मचारी संघटनेला आज अकराला चर्चेची वेळ देण्यात आली होती.

कामबंद होता- होता राहिले
आज सकाळी कर्मचारी महापालिका आवारात जमा झाले होते. चर्चेसाठी बोलावलेच जात नसल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी कामबंदचा पवित्रा घेतला होता. मात्र, सायंकाळी आयुक्त चर्चा करणार असल्याचा निरोप मिळाल्याने कर्मचारी आपापल्या कामावर गेले. सायंकाळी पाचची चर्चेची वेळही निघून गेल्याने कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. आयुक्त धायगुडे स्वच्छता अभियानाच्या बैठकीला निघून गेल्याने संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी आवारातच वाट पाहत राहिले.

गाडी निघाली आणि...
बैठक संपल्यानंतर आयुक्तांशी चर्चा होईल या अपेक्षेने आवारात वाट पाहत उभे असलेले कर्मचारी आणि बैठक संपल्यानंतर आयुक्तांची मार्गस्थ झालेली गाडी अशा स्थितीत चर्चा होईल अथवा नाही असे चित्र होते, त्यातच कर्मचाऱ्यांनी एकजुटीचा नारा दिला. शेवटी संघटनेचे सुनील देवरे, प्रसाद जाधव व भानुदास बगदे यांना बोलावण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडी, घोषणाबाजीबद्दल आयुक्तांनी आक्षेप घेत, आपल्याला दुसरीही कामे आहेत असे म्हणत नाराजीचा सूर लावला व उद्या (ता. 16) चर्चा करू, असे आश्‍वासन दिले. त्यामुळे उद्या चर्चेअंती तोडगा किंवा कामबंद असा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे.

Web Title: dhule municipal corporation employee