Dhule News : घरपट्टीचा वाद उच्च न्यायालयाच्या पटलावर! धुळ्यात पठाणी आकारणीविरोधात रोष

Dhule News : महापालिकेच्या पठाणी स्वरूपातील घरपट्टी आकारणी व वसुलीविरोधात धुळेकरांमध्ये तीव्र रोष आहे.
Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporationesakal

धुळे : शहरातील भडकलेला ज्वलंत आणि जिव्हाळ्याचा प्रश्‍न बनलेल्या पठाणी स्वरूपातील घरपट्टी आकारणी आणि वसुलीविरोधात माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. त्यांची जनहित याचिका खंडपीठाने दाखल करून घेतली आहे.

महापालिकेच्या पठाणी स्वरूपातील घरपट्टी आकारणी व वसुलीविरोधात धुळेकरांमध्ये तीव्र रोष आहे. शहर विकास प्रक्रियेत दमछाक होणाऱ्या महापालिकेने पुरेशा सोयी-सुविधा न पुरविता केलेल्या जाचक करवाढीविरोधात सर्वच पक्षांमध्येही खदखद आहे. (Dhule municipal Gharpatti dispute in High Court marathi news)

श्री. जाधव यांनी सांगितले, की गेल्या काही महिन्यांपासून महापालिका हद्दीतील रहिवाशांना नवीन घरपट्टी अर्थात मालमत्ता करवाढीच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने आकारणी, तसेच काही मालमत्ताधारकांना सरासरी चारपट, तर काहींना ९०/१० पटीने वाढीव दराने वसुली बिले पाठविलेली आहेत. त्यावर सुनावणीची केवळ औपचारिकता पूर्ण करून घेतली जात आहे. कोणत्याही प्रकारे नियमानुसार दर कमी केले

गेलेले नाहीत. त्यामुळे स्वत: महापालिका व शासनाच्या नगरविकास विभागाविरोधात औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. कोणत्याही स्थितीत बेकायदेशीरपणे केलेल्या घरपट्टी वाढीविरोधात असलेले सर्व पुरावे औरंगाबाद खंडपीठात सादर करून धुळेकरांवर लादलेल्या सुलतानी करवाढीचा बोजा उतरविण्यासाठी लढा सुरू केला आहे.

याचिकेबाबत मुद्दे

महापालिकेने वाढीव घरपट्टी आकारणीपूर्वी झोननिहाय व बांधकाम वर्षनिहाय दरपत्रक ठरवून तशी शासनाची मंजुरी घेतली पाहिजे होती; परंतु तसे न करता केवळ २०१५/९६ च्या एका ठरावाच्या आधारे प्रशासकीय स्तरावरूनच चुकीचा अर्थ लावत बेकायदेशीरपणे ही आकारणी केलेली आहे.

ज्यांचे ग्राउंड फ्लोअरला जुने बांधकाम आहे व त्यात कोणताही बदल नसेल, मात्र वरचा मजला नवीन बांधला असेल तर केवळ वरच्या मजल्यालाच आजच्या दराने आकारणी केली पाहिजे होती; परंतु तसे न करता महापालिकेने ग्राउंड फ्लोअरपासून सरसकट आजच्या दराने अवाजवी वाढीव मालमत्ता कर आकारणी केली असून, ती पूर्णतः चुकीची आहे.

महापालिका अधिनियमात घसाऱ्याबाबत कुठलीही तरतूद नसताना काही नागरिकांना सुनावणीची केवळ औपचारिकता पूर्ण करून नंतर घसाऱ्याच्या नावाखाली किरकोळ रक्‍कम कमी करून मोठ्या प्रमाणावर भुर्दंड जसाचा तसाच ठेवलेला आहे. यात दिशाभूल करून जास्तीचीच बिले दिली जात आहेत.(latest marathi news)

Dhule Municipal Corporation
Nashik News : महिनाभरात 502 नळजोडण्या खंडित

याचिकेतील मागणी

त्याचप्रमाणे १९९६ च्या शासन परिपत्रकात स्पष्टपणे आदेश आहेत की जुन्या घरांना दामदुपटीपेक्षा मालमत्ता कर आकारणी करता येणार नाही. म्हणूनच शासनाकडून योग्य दरपत्रकास मंजुरी घेतल्यानंतरच धुळेकरांना नवीन करासंबंधी दराची आकारणी करावी, अशी मागणी केली आहे.

केवळ महापालिकेचे उत्पन्नवाढीसाठी नागरिकांची लूट करणे ही पूर्णतः बेकायदेशीर प्रक्रिया आहे. यासाठी ज्या सनदशीर लढ्याची आवश्यकता होती आणि खऱ्या अर्थाने न्याय मिळू शकेल तेथे जनहित याचिका दाखल केली आहे. धुळेकरांना अशा अन्यायी प्रक्रियेतून बाहेर काढण्यासाठी ताकदीने लढा देण्याची तयारी आहे, तसेच न्यायासाठी सबळ पुरावे सादर केले आहेत, असे याचिकाकर्ते श्री. जाधव यांनी सांगितले.

"शहरातील नागरिकांची द्विधा मनस्थिती असतानाच एका बाजूला अनेक संघटनांकडून जुन्या दरानेच मालमत्ता कर भरावा, असे केवळ आवाहन केले जात असते. त्यास कोणताही आधार नाही व नव्हता. कारण नागरिक महापालिकेत गेल्यावर प्रशासन नवीन वाढीव दरानेच कर भरण्यास सांगत आहे. त्यामुळे केवळ आवाहन करून काहीही होणार नव्हते, तर सनदशीर मार्गाने लढण्याची गरज होती व आहे. त्यासाठी जनहित याचिका दाखल केली. यात पुरावे सादर करून धुळेकरांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आहे."-संजय जाधव, माजी नगराध्यक्ष (latest marathi news)

Dhule Municipal Corporation
Nashik Water Management : प्रत्येक थेंबाचा लागणार अचूक हिशोब; शहरात 7 हजार स्काडा मीटर कार्यान्वित

व्यापारी महासंघही जाणार खंडपीठात

महापालिका शहरात मालमत्ता करवाढीनुसार वसुलीची बिले वाटप करीत आहे. अशा दरातील अवास्तवता, वाढीबाबत संभ्रमावस्था, आकारणीत गोंधळ, मोजमापात गौडबंगाल आणि करपत्र वाटपात अनियमितता आदींमुळे धुळेकरांची झोप उडाली आहे. काहींना तर करपत्र पाहून छातीत धडकी भरली आहे.

जनतेतील हा असंतोष पाहता मंगळवारी (ता. १९) धुळे व्यापारी महासंघातर्फे बैठक झाली. यात ॲड. समीर पंडित यांनी उपस्थितांच्या अडचणी, व्यथा जाणून घेतल्या. त्यांनी शंकांचे निरसन केले. यासंबंधी समस्येसाठी प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या करपत्राच्या तारखेपासून २१ दिवसांच्या आत तक्रार दाखल करावी व पोच घ्यावी, असे ॲड. पंडित यांनी सूचित केले.

तसेच करवाढ व वसुलीसंदर्भात समाधान केवळ उच्च न्यायालयात मिळेल, असा सल्ला त्यांनी दिला. त्यानुसार धुळे व्यापारी महासंघाने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीस महासंघाचे प्रवर्तक नितीन बंग, माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन यांच्यासह व्यापारी उपस्थित होते. महासंघाची पुढील बैठक शुक्रवारी (ता. २२) रात्री नऊला केमिस्ट भवनात (नगरपट्टी) होणार आहे. व्यापाऱ्यांसह धुळेकरांना उपस्थितीचे आवाहन महासंघाने केले.

Dhule Municipal Corporation
Jalgaon Officers Transfer: धुळ्यात अविश्‍वास अन्‌ जळगावात सीईओपदी नियुक्ती! लोकप्रतिनिधींच्या नाराजीतून अंकित यांची बदली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com