अमरिश पटेल, कदमबांडेंच्या निवासस्थानी छापे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

धुळे - 'डिसान' ग्रुपच्या निरनिराळ्या कंपन्यांमध्ये भागीदार असलेले कॉंग्रेसचे दिग्गज नेते, माजी शिक्षणमंत्री, शिरपूरचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार अमरिशभाई पटेल, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धुळ्यातील नेते माजी आमदार राजवर्धन कदमबांडे आणि उर्वरित सहा जणांच्या शिरपूर, धुळे येथील निवासस्थानी आज सकाळी आठला नाशिक, मुंबई येथील प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी छापा टाकला.

धुळे - 'डिसान' ग्रुपच्या निरनिराळ्या कंपन्यांमध्ये भागीदार असलेले कॉंग्रेसचे दिग्गज नेते, माजी शिक्षणमंत्री, शिरपूरचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार अमरिशभाई पटेल, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धुळ्यातील नेते माजी आमदार राजवर्धन कदमबांडे आणि उर्वरित सहा जणांच्या शिरपूर, धुळे येथील निवासस्थानी आज सकाळी आठला नाशिक, मुंबई येथील प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी छापा टाकला.

पथकांनी तपासणीवेळी संबंधितांच्या निवासस्थानांमधील कुठल्याही व्यक्तीला बाहेर पडण्यास आणि बाहेरील कुठल्याही व्यक्तीला आत प्रवेशासाठी मज्जाव केला. निवासस्थानांमधील संबंधित व्यक्तींचे मोबाईल ताब्यात घेतले. या प्रकारामुळे जिल्ह्यासह सर्वत्र राजकीय वातावरण ढवळून निघत असताना उलटसुलट चर्चांनाही उधाण आले. सकाळी आठला सुरू झालेल्या चौकशीसह कागदपत्रांची तपासणी रात्री नऊनंतर सुरूच होती.

प्राप्तिकर विभागाच्या पथकातील तब्बल साडेचारशे अधिकारी, कर्मचारी हे 70 वाहनांच्या ताफ्यासह शिरपूर आणि धुळे येथे रात्री उशिरापर्यंत तळ ठोकून होते. शिरपूर येथे पथकातील अडीचशे कर्मचारी, तर उर्वरित धुळे येथे संबंधित नेते, समर्थक पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी चौकशीसह कागदपत्रांची तपासणी करीत होते.

धुळे शहरालगत "एमआयडीसी'त मुख्य कार्यालय असलेल्या डिसान ऍग्रो-टेक लिमिटेड कंपनीशी निगडित डिसान ग्रुप आहे. सोयाबीनवर प्रक्रिया करण्यात हा उद्योगसमूह राज्यात आघाडीवर आहे. तसेच विस्तारात तेल, ढेप, कोल्डस्टोअरेज, कापड व टीशर्ट, टॉवेल निर्मितीसह विविध प्रकारची निर्यातक्षम उत्पादने हा समूह घेतो. या ग्रुपचे आमदार पटेल, माजी आमदार कदमबांडे निरनिराळ्या कंपन्यांचे भागीदार आहेत.

या ग्रुपच्या कंपनीचे सांताक्रूझ (मुंबई) येथे कॉर्पोरेट ऑफिस आहे. तेथे कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची सहा दिवसांपूर्वी प्राप्तिकर विभागाने तपासणी केली. त्यात सोयाबीन खरेदी किंवा कंपन्यांच्या ताळेबंदमधील व्यवहाराची मांडणी सुसंगत न वाटल्याच्या कारणावरून प्राप्तिकर विभागाने हे छापे घातल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

प्राप्तिकर विभागाने डिसान ग्रुपशी निगडित शिरपूर व धुळे येथील कंपन्या, त्यातील भागीदार आमदार पटेल, माजी आमदार कदमबांडे, तसेच शिरपूरचे माजी नगराध्यक्ष तथा कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष राजगोपाल भंडारी, अशोक कलाल, व्यापारी बबन अग्रवाल, सनदी लेखापाल विजय राठी, ऍड. सी. बी. अग्रवाल आदींच्या निवासस्थानी चौकशी सुरू केली. मात्र, प्राप्तिकर विभागाचे छापासत्र व चौकशीसह कागदपत्र तपासणीतील वस्तुस्थितीदर्शक माहिती रात्री उशिरापर्यंत समोर येऊ शकली नाही.

आमदार पटेल यांच्या शिरपूरमधील "जनक व्हिला' या निवासस्थानी तपासणी अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा होता. माजी आमदार कदमबांडे यांच्या धुळे शहरातील ऐंशी फुटी रोड परिसरातील निवासस्थानाजवळ काही काळ समर्थकांनी गर्दी केली होती. चौकशी, कागदपत्रांच्या तपासणीवेळी कदमबांडे हे कुटुंबातील सदस्यांसह घरातच होते.

प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांमध्ये आवश्‍यक त्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. नियमित तपासणीचाही एक भाग म्हणून कागदपत्रे पाहिली जात आहेत. मी शिरपूर येथेच असून या विभागाला अपेक्षित सहकार्य केले जात आहे.
- अमरिशभाई पटेल, आमदार, कॉंग्रेस, शिरपूर

डिसान ग्रुपच्या कोल्डस्टोअरेज, परम कंपनीत भागीदार आहे. त्यातील कागदोपत्री व्यवहारांची नियमित तपासणी प्राप्तिकर विभागाचे पथक करीत आहे. त्यांना आवश्‍यक ते सहकार्य केले जात आहे.
- राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस, धुळे

Web Title: dhule news amrish patel and rajwardhan kadambande home raid