भुजबळांवरील कारवाई सूडबुद्धीनेच : डॉ. कैलास कमोद

प्रा. भगवान जगदाळे
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : ओबीसी नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात शासन सूडबुद्धीने कारवाई करत असून राज्यासह केंद्रात अनेक भ्रष्टाचारी नेते व मंत्री असताना कारवाई फक्त भुजबळांवरच का? असा सवाल ओबीसी महामंडळाचे पदाधिकारी व समता परिषदेचे राज्य सरचिटणीस डॉ. कैलास कमोद यांनी भुजबळ समर्थकांच्या बैठकीत उपस्थित केला.

निजामपूर-जैताणे (धुळे) : ओबीसी नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात शासन सूडबुद्धीने कारवाई करत असून राज्यासह केंद्रात अनेक भ्रष्टाचारी नेते व मंत्री असताना कारवाई फक्त भुजबळांवरच का? असा सवाल ओबीसी महामंडळाचे पदाधिकारी व समता परिषदेचे राज्य सरचिटणीस डॉ. कैलास कमोद यांनी भुजबळ समर्थकांच्या बैठकीत उपस्थित केला.

जैताणे (ता.साक्री) येथील संत सावता महाराज मंदिरात ही बैठक घेण्यात आली. समता परिषदेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष अशोक माळी, धुळे जिल्हाध्यक्ष देवेंद्र पाटील, साक्री तालुकाध्यक्ष राजेश बागुल, जैताणेचे सरपंच संजय खैरनार, अनिल सोनवणे, दौलत जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. कमोद म्हणाले की, आमची लढाई ही न्यायालयाविरुद्ध नसून शासनाविरुद्ध आहे. वास्तविक भुजबळ न्यायालयीन चौकशीस सर्वतोपरी सहकार्य करायला तयार असूनही केवळ चौकशीच्या नावाखाली त्यांना दोन वर्षांपासून डांबून ठेवण्यात आले आहे. भुजबळांना जाणीवपूर्वक 'टार्गेट' केले जात असून अल्पसंख्याक, बहुजन व ओबीसी नेतृत्व संपविण्याचा हा शासनाचा केविलवाणा प्रयत्न आम्ही हाणून पाडू, असा इशाराही डॉ. कैलास कमोद यांनी यावेळी दिला. केवळ राज्य शासनालाच नव्हे तर केंद्र शासनालाही भुजबळांची भीती वाटते. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचीही भेट घेण्यात आली आहे. भुजबळ बाहेर आल्यानंतर अनेक राजकीय उलथापालथी व स्थित्यंतरे होतील. त्यामुळे त्यांच्या विरोधकांना आतापासूनच धडकी भरली आहे. समता सैनिक, भुजबळ समर्थक व ओबीसी समाज बांधवांमध्ये प्रचंड अस्वस्थता व असंतोष पसरला असून ही खदखद व त्याचा प्रचंड उद्रेक शासनाला येत्या अधिवेशन काळात पहायला मिळेल. भुजबळ समर्थकांनी भविष्यात कोणत्याही पक्षाच्या भरवशावर न राहता आगामी काळात "समता पक्ष" हाच आपला एकमेव पक्ष असेल. असे भावनिक आवाहन करून स्वतंत्र पक्षस्थापनेचे संकेतही त्यांनी दिले आहेत. उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील सर्वपक्षीय, प्रत्येक आमदाराला "तुम्ही भुजबळांसाठी काय करणार आहात?" असा लेखी जाब भुजबळ समर्थकांतर्फे विचारला जाणार आहे. त्यानुसारच आगामी काळात कोणाच्या पाठीशी उभे राहायचे ते ठरेल.

यावेळी समता परिषदेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष अशोक माळी, धुळे जिल्हाध्यक्ष देवेंद्र पाटील, साक्री तालुकाध्यक्ष राजेश बागुल, जैताणेचे सरपंच संजय खैरनार, अनिल सोनवणे आदींनी मनोगते व्यक्त केली. समता सैनिक, भुजबळ समर्थक व ओबीसी बांधवांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. कमोद, देवेंद्र पाटील, अशोक माळी आदींनी उत्तरे दिली. अनिल सोनवणे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. राजेश बागुल यांनी आभार मानले. यावेळी माळमाथा परिसरातील भुजबळ समर्थक, समता सैनिक व ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: dhule news chhagan bhujbal politics dr kailas kamod