अफवांवर विश्‍वास ठेवू नका

अफवांवर विश्‍वास ठेवू नका

धुळे - राईनपाडा (ता. साक्री) येथे काल मुले पळविणारी टोळी असल्याच्या संशयातून ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, नागरिकांनी अफवांवर विश्‍वास न ठेवता, कायदा हातात न घेता संशयितांबाबत तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी केले आहे.

राईनपाडा हे साक्री तालुक्‍यातील पश्‍चिम पट्ट्यातील आदिवासी गाव आहे. गावाचा आज आठवडे बाजार असल्याने काही जण फिरत होते. ते लहान मुले पळविणाऱ्या टोळीतील असावेत, या संशयातून जमावाने तेथील ग्रामपंचायत कार्यालयात डांबून जबर मारहाण केली. काही जणांनी संशयितांना पोलिसांच्या हवाली करा, असेही सांगितले. परंतु संतप्त जमावाने कोणाचेच न ऐकता पाच जणांना बेदम मारहाण केली. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. हे पाचही मृत सोलापूर जिल्ह्यातील आहेत.

या घटनेमुळे जिल्हाभरात संभ्रमाचे आणि भीतीचे वातावरण आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी अफवांवर विश्‍वास न ठेवता संशयित व्यक्तींबाबत त्वरित संबंधित पोलिस ठाण्यात माहिती द्यावी किंवा त्यांना पोलिसांच्या हवाली करावे. पोलिस योग्य ती चौकशी करून खातरजमा करतील. यामुळे आजच्या सारखे अनर्थ टळतील. कुणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन श्री. माळी यांनी केले आहे. शिवसेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी याबाबत जनजागृती करून अशा घटना टाळाव्यात, असेही पत्रकात म्हटले आहे.

कुणालाही सोडू नका - दोरजे
राईनपाडा (ता. साक्री) येथील हिंसक जमावाने अफवा, गैरसमजुतीला बळी पडून ग्रामपंचायतीत पाच जणांना कोंडून त्यांची आज दुपारी बाराच्या सुमारास क्रूरतेने हत्या केली. या घटनेच्या क्‍लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देश हादरला आहे. या पार्श्‍वभूमीवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांनी सायंकाळी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी राईनपाडा गावातील महिला, पुरुष फरार झाल्याने तपासात अडथळा निर्माण झाला. घटनेमागचे मूळ कारण हाती लागू शकलेले नाही. त्यामुळे डॉ. दोरजे यांनी ‘क्‍लिप’च्या आधारे पाच जणांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्यांना कुठल्याही स्थितीत सोडू नये, त्यांना अटक केल्याशिवाय स्वस्थ बसू नये, असा आदेश जिल्हा पोलिस प्रशासनाला दिला आहे. 

जीवघेण्या अफवा थांबवा - थोरात
राईनपाडा (ता. साक्री) येथे पाच जणांची हिंसक जमावाकडून झालेली निर्घृण हत्येची घटना ही चिंताजनक आहे. त्या पाच अनोळखी व्यक्ती होत्या, मुले पळविणाऱ्या होत्या, अशा संशयातून त्यांची हत्या करण्यात आली. राज्यात ठिकठिकाणी अशा घटना घडत असून नागरिक, जमाव कायदा हातात घेत आहेत. ही गंभीर व चिंताजनक स्थिती आहे. अफवा जीवघेण्या होत असल्याने त्यावर सरकारला गंभीरपणे उपाययोजना कराव्या लागतील, अशी प्रतिक्रिया माजी महसूलमंत्री, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com