तपासावर पर्यवेक्षणासाठी "एसआयटी'ची नियुक्ती 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

धुळे - शहरातील कुख्यात गुंड रफियोद्दीन शफियोद्दीन शेख ऊर्फ गुड्ड्याच्या हत्याकांड प्रकरणी होत असलेल्या काही तक्रारींच्या अनुषंगाने सात सदस्यीय विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती झाली आहे. हत्याकांडाचा तपास मात्र धुळे पोलिसांकडे राहील. त्यावर "एसआयटी'च्या पथकाचे नियंत्रण, पर्यवेक्षण राहील, अशी माहिती नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनॉयकुमार चौबे यांनी आज "सकाळ'शी बोलताना दिली. 

धुळे - शहरातील कुख्यात गुंड रफियोद्दीन शफियोद्दीन शेख ऊर्फ गुड्ड्याच्या हत्याकांड प्रकरणी होत असलेल्या काही तक्रारींच्या अनुषंगाने सात सदस्यीय विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती झाली आहे. हत्याकांडाचा तपास मात्र धुळे पोलिसांकडे राहील. त्यावर "एसआयटी'च्या पथकाचे नियंत्रण, पर्यवेक्षण राहील, अशी माहिती नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनॉयकुमार चौबे यांनी आज "सकाळ'शी बोलताना दिली. 

श्री. चौबे म्हणाले, की गुड्ड्याच्या हत्याकांड प्रकरणी दाखल गुन्ह्याशी निगडित होत असलेल्या काही तक्रारींच्या अनुषंगाने विशेष तपास पथकाची नियुक्ती केली. या गुन्ह्याचा तपास सखोल, पारदर्शी, कुशलतेने होण्यासाठी मालेगावचे अप्पर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या नियंत्रणाखाली सात सदस्यीय विशेष तपास पथक स्थापन केले. हत्याकांडाचा तपास धुळे शहर उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक हिंमतराव जाधव यांच्याकडे राहील. या तपासावर पूर्णतः नियंत्रण, पर्यवेक्षण "एसआयटी' पथकप्रमुख पोद्दार यांचे राहील. हत्याकांडाशी निगडित तक्रारी, कुठलेही "मॅटर' "एसआयटी'चे पथक हाताळेल. त्यावर पथकाकडून होणाऱ्या बैठकीत चर्चेअंती पथकप्रमुख पोद्दार योग्य तो निर्णय घेतील. 

सात सदस्यांची नियुक्‍ती 
पथकप्रमुख पोद्दार यांच्यासह विशेष तपास पथकात मालेगावचे पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने, धुळ्याचे पोलिस उपअधीक्षक हिंमतराव जाधव, धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील निरीक्षक आनंद निकम, मालेगावच्या आझादनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे, धुळे "एलसीबी'चे सहाय्यक पोलिस निरीक्षक पी. जे. राठोड, धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांचा समावेश आहे. पथकप्रमुख पोद्दार यांनी सोमवारी (ता. 7) सायंकाळी सहाला जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रामकुमार यांची येथे भेट घेत हत्याकांडाच्या गुन्ह्याविषयी प्राथमिक माहिती घेतली. 

गोटे यांच्या तक्रारी 
येथील भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी काही तक्रारी करत गुड्ड्याच्या हत्याकांडाचा तपास मुंबई क्राईम ब्रॅंचकडे सोपवावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली. त्यानुसार गृह विभागाचे कक्ष अधिकारी अर्जुन वाघमोडे यांनी गुड्ड्या हत्याकांडाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे देण्यात येत असून, त्याबाबत कार्यवाही करून अनुपालन अहवाल शासनास सादर करावा, असे पत्र 31 जुलैला पोलिस महासंचालकांना पाठविले आहे. 

पोलिस अधीक्षकांचेही पत्र 
यादरम्यान, धुळे पोलिसांनी गुड्‌ड्‌याच्या हत्याकांडाचा तपास चांगल्या रीतीने केला असून स्थानिक पोलिस दलाचे मनोबल उंचावलेले राहण्यासाठी हा तपास धुळे पोलिसांकडेच राहू द्यावा, असे पत्र जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रामकुमार यांनी पोलिस महासंचालक सतीश माथूर यांना पाठविले आहे. गुंड गुड्‌ड्‌याची 18 जुलैला सकाळी सव्वासहाला वर्दळीच्या पारोळा रोडवरील गोपाल टी हाउससह समोरील रस्त्यावर सशस्त्र अकरा ते बारा मारेकऱ्यांकडून निर्घृण हत्या झाली. येथील पोलिसांनी सर्व प्रमुख मारेकरी व त्यांना आसरा देणारे मिळून 16 आरोपी गजाआड केले आहेत. फरार आरोपी श्‍याम गोयर, विजय गोयर ऊर्फ बडा पापा यांचा शोध सुरू आहे. 

पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधा 
गुड्ड्याच्या हत्याकांडसंबंधी गुन्ह्यासंदर्भात कुणाला काही माहिती द्यावयाची असल्यास त्यांनी विशेष पोलिस पथकप्रमुख हर्ष पोद्दार यांच्याशी (मोबाईल ः 77210 56999), तसेच मालेगावचे पोलिस उपअधीक्षक राजमाने (मोबाईल ः 94232 52207), पोलिस उपअधीक्षक जाधव (मोबाईल ः 94239 85098) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही प्रशासनाने केले. 

Web Title: dhule news crime