धुळ्यातील चार पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

धुळे - श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयांतर्गत सर्वोपचार रुग्णालयात नेमणुकीला असताना कर्तव्यात कसूर केल्याने चार पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक एम. रामकुमार यांनी ही कारवाई केली. त्यामुळे कर्मचारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

धुळे शहरात दोन दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशन परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. यातील काही संशयित सर्वोपचार रुग्णालयात दाखल होते. या स्थितीत भरत सूर्यवंशी, मयूर थोरात, कलीम शेख, राजू मोरे, असे चार पोलिस कर्मचारी "गार्ड' म्हणून तैनात होते. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल वडनेरे यांनी रात्री गस्त घातली असता नेमणुकीतील चार "गार्ड' गैरहजर दिसले. गंभीर बाब म्हणजे त्यांची हत्यारे एका कोपऱ्यात पडून होती. त्यामुळे संतप्त पोलिस निरीक्षक वडनेरे यांनी अधीक्षक एम. रामकुमार यांच्याकडे वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर केला. त्याची दखल घेत त्यांनी रुग्णालयात नियुक्त चार "गार्ड'ना निलंबित केले. पोलिस अधीक्षकांच्या कठोर पवित्र्यामुळे इतर काही कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

दीड महिन्यापूर्वी रुग्णाच्या नातेवाइकांकडून वैद्यकीय अधिकाऱ्याला झालेल्या बेदम मारहाण प्रकरणामुळे हिरे महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय देशभरात चर्चेचा विषय ठरले. यापाठोपाठ राज्यात अन्य दोन घटना घडल्याने रुग्णालयात सुरक्षिततेसाठी पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जावी, अशी मागणी वैद्यकीय संघटनांकडून झाली. त्याप्रमाणे येथील रुग्णालयात सरासरी 50 सुरक्षारक्षकांची नेमणूक झालेली आहे.

Web Title: dhule news crime news police action employees dismissed