धुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी कडकडीत बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी होत असलेल्या शेतकरी संपाच्या सोमवारी सलग पाचव्या दिवशी 'बंद'ला जिल्ह्यातूनही चांगला प्रतिसाद मिळाला. धुळे शहरातील आग्रा रोडवरील मुख्य बाजारपेठ बंद ठेवावी, असे आवाहन करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकरी संपाच्या पार्श्‍वभूमीवर "बंद'ला पाठिंबा मिळविला

धुळे - प्रमुख शहरी भागातील संमिश्र प्रतिसाद वगळता जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण भागात शेतकरी संपाला पाठिंब्यासाठी सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी लोणखेडी (ता. धुळे) फाट्यावर अटक केली, तर सत्तेतील घटक पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस धुळे शहर, शिंदखेडा व ठिकठिकाणी "बंद'चे आवाहन करत काढलेल्या फेरीला त्या- त्या भागातील व्यापारी, दुकानदारांनी प्रतिसाद दिला. जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरत, व्यापारी व व्यावसायिक व्यवहार बंद ठेवत "बंद'ची तीव्रता वाढवत आहे. 
 
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी होत असलेल्या शेतकरी संपाच्या सोमवारी सलग पाचव्या दिवशी 'बंद'ला जिल्ह्यातूनही चांगला प्रतिसाद मिळाला. धुळे शहरातील आग्रा रोडवरील मुख्य बाजारपेठ बंद ठेवावी, असे आवाहन करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकरी संपाच्या पार्श्‍वभूमीवर "बंद'ला पाठिंबा मिळविला. दुपारी दीडनंतर व्यवहार पूर्ववत सुरू झाले. 
 
धुळे तालुका 
अनेक शेतकऱ्यांनी शेतकरी विरोधी धोरणांसह राज्य सरकारचा निषेध करत कापडणे येथे उन्नत शेती समृद्ध अभियानांतर्गत कार्यक्रम उधळून लावला. अधिकाऱ्यांना गावाबाहेर पडण्यास भाग पाडले. कापडणे येथील बाजार बंदच होता. धुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत शुकशुकाट होता. लोणखेडी फाट्यावर सरकार विरोधी घोषणाबाजीसह चक्का जाम आंदोलन करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगदीश पाटील, बाळू सोनवणे यांच्यासह शेतकरी सदस्यांना तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने अटक केली. आंदोलक पाटील, सोनवणे यांना वगळता इतर शेतकऱ्यांची दुपारी सुटका केली. लामकानी येथे "बंद'ला पाठिंबा दिला गेला. तालुक्‍यातील अनेक गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. 

साक्री तालुका 
साक्री तालुक्‍यात साक्री शहरासह ठिकठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. साक्री येथे सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेने निदर्शने करत "बंद' ला पाठिंबा दिला. म्हसदी येथे आठवडे बाजार बंद राहिला, तर खासगी वाहन चालक, दुकानदार "बंद'मध्ये सहभागी झाले. पिंपळनेर येथे बाजार समितीतील व्यवहार बंद होते. तसेच 50 टक्के व्यवहार बंद ठेवण्यात आल्याने त्या भागात शुकशुकाट होता. वार्सा येथे आठवडे बाजार बंद राहिला. 

शिंदखेडा तालुका 
शिंदखेडा येथे शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसने "बंद'चे आवाहन केल्यानंतर व्यावसायिकांनी प्रतिसाद दिला. नरडाणा येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबसिंग रघुवंशी आणि पदाधिकाऱ्यांनी आवाहन केल्यानंतर व्यापारी, दुकानदार "बंद'मध्ये सहभागी झाले. काही शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकत सरकारचा निषेध केला. 

शिरपूर तालुका 
शिरपूर शहरासह तालुक्‍यात संपाचा तीन ते चार दिवस जोर कायम होता. मात्र, सोमवारी बाजार समितीसह इतर व्यवहार सुरळीत सुरू होते. संपानिमित्त "बंद' आंदोलनापासून हा तालुका दूरच होता. 

जिल्ह्यात व्यवहार ठप्प 
"बंद'मध्ये सहभागी झालेली गावे, शहरे, बाजार समित्यांसह खासगी प्रतिष्ठानांमुळे व्यवहार ठप्प झाले. रोजच्या कोट्यवधींच्या उलाढालीवर परिणाम झाला. पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त होता. आंदोलने शांततेत सुरू होती.

Web Title: Dhule News: Farmer Strike in Dhule District