प्रादेशिक खाद्यपदार्थांचे ब्रॅंडिंग करण्यावर भर

निखिल सूर्यवंशी
मंगळवार, 16 जानेवारी 2018

धुळे - "पर्यटनवाढीसाठी निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिकतेसह निरनिराळी वैशिष्ट्ये असलेल्या स्थळांच्या ठिकाणी खास महोत्सव साजरा करताना खाद्यसंस्कृतीचा मिलाफ घडवून आणत पर्यटकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे. अशा महोत्सवांतून कोल्हापूरचा झणझणीत ठेचा, नाशिकची "वाइनरी' असो की खानदेशातील भरीत, भाकरी, खापराची पुरणपोळी... या सर्वांचे "ब्रॅंडिंग' करून राज्यातील पर्यटन क्षेत्राला नवा आयाम देण्याचा प्रयत्न असल्याचे पर्यटन व रोहयोमंत्री जयकुमार रावल यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.
रावल म्हणाले, की रोजगारनिर्मितीला पूरक ठरणाऱ्या पर्यटन क्षेत्राला चालना मिळावी, म्हणून नवनवे प्रयोग राबविले जात आहेत. यात "इव्हेंट'द्वारे त्या-त्या जिल्हा, प्रादेशिक विभागातील खास वैशिष्ट्ये, खाद्यसंस्कृतीचा मिलाफ करून देशभरात "महाराष्ट्राचे ब्रॅंडिंग' करण्याचा प्रयत्न आहे. त्याची सुरवात लवकरच औरंगाबाद येथील एलोरा महोत्सवापासून होत आहे.

"पॅकेज'द्वारे चालना
पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्र पिछाडीवर राहू नये, म्हणून विविध उपक्रम हाती घेतले आहेत. महाराष्ट्रातील सर्व पर्यटनस्थळांबाबत उत्सुकता निर्माण व्हावी, त्यांना सर्व ठिकाणी पूरक सोयीसुविधा मिळाव्यात, म्हणून त्या-त्या भागातील खास वैशिष्ट्ये, खाद्यसंस्कृती ही खास महोत्सवांतून समोर आणली जाईल. त्यात विशेष "पॅकेज' तयार करून त्याचे "इव्हेंट'मध्ये रूपांतर करत पर्यटनवाढीला चालना दिली जाणार आहे.

सारंगखेडा यात्रा "ग्लोबल'
अश्‍व बाजारासाठी प्रसिद्ध असलेली सारंगखेडा (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील यात्रा पर्यटनमंत्री रावल यांच्या पुढाकारातून "ग्लोबल' झाली. महिनाभर चाललेल्या या यात्रेत देशभरातील सहा लाखांहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली. मंत्री रावल यांच्या मागणीनुसार पहिले अश्‍व संग्रहालय उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पर्यटकांचे लक्ष वेधण्यासाठी मोठ्या, ऐतिहासिक यात्रांचेही "ब्रॅंडिंग' पर्यटन मंत्रालय करणार आहे.

Web Title: dhule news Focus on branding regional food