बिबट्याच्या हल्ल्यात ५०० कोंबड्या मृत्युमुखी

प्रा. भगवान जगदाळे
गुरुवार, 22 मार्च 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : खुडाणे (ता. साक्री) गावशिवारातील शेतकरी बाळू भगवान आघाव यांच्या डोमकानी रस्त्यावरील शेतात बुधवारी (ता. २१) पहाटे तीनच्या सुमारास बिबट्याने पोल्ट्री फार्मची जाळी उचकटून केलेल्या हल्ल्यात सुमारे ५०० कोंबड्या फस्त केल्याची माहिती तरुण शेतकरी राकेश बाळू आघाव यांनी दैनिक 'सकाळ'शी बोलताना दिली.

घटनास्थळी नर-मादींसह सुमारे दीडशेहून अधिक कोंबड्यांची पिले छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आली. घटनास्थळीच बिबट्याच्या पायांचे/पंजांचे ठसेही आढळून आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली व पंचनामा केला. बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करून नुकसानभरपाईची मागणी संबंधित शेतकऱ्यासह सरपंच प्रतिनिधी पराग माळी, उपसरपंच नामदेव गवळे, ग्रामपंचायत सदस्य कन्हैयालाल काळे आदींनी केली आहे.

नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी वाचला...
शेजारच्या शेडमध्ये झोपलेल्या शेतकऱ्याने बिबट्याला कोंबड्यांवर हल्ला करताना पाहताक्षणीच तेथून भीतीने पळ काढला व साधारण एक-दीड किलोमीटर अंतरावरील एका शेतकऱ्याच्या शेतावरील रखवालदाराच्या झोपडीत सकाळ होईपर्यंत आश्रय घेतला. त्यानंतर सकाळी सातच्या सुमारास त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती मुलासह गावकऱ्यांना दिली.

दरम्यान, खुडाणेसह डोमकानी शिवारातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही दोन-तीनदा बिबट्याने गायींवर हल्ले चढवून त्यांना फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी बिबट्याच्या पिलांना तेथून हुसकावून लावल्याची माहितीही शेतकरी राकेश आघाव यांनी दिली आहे. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे परिसरातील शेतकरी आता रात्री-पहाटेला भीतीपोटी व दहशतीपोटी पिकांना पाणी देण्यासह शेतात उघड्यावर झोपायला जाणे टाळतात. ज्या शेतकऱ्यांची शेतात सुरक्षित घरे आहेत असेच शेतकरी शेतात थांबतात, अशीही प्रतिक्रिया त्यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

Web Title: dhule news leopard attack poultry at khudane area