खुडाणे शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात गाभण गाय ठार

प्रा. भगवान जगदाळे
बुधवार, 10 जानेवारी 2018

निजामपूर-जैताणे (धुळे): माळमाथा परिसरातील खुडाणे (ता. साक्री) शिवारातील शेतकरी देवाजी दगा हेमाडे यांच्या शेतात नेहमीप्रमाणे बांधलेल्या त्यांच्या गाभण गायीवर आज (बुधवार) मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गाय जागीच ठार झाली. त्यात सदर शेतकऱ्याचे सुमारे लाखावर नुकसान झाले असून, बिबट्याने गायीच्या मानेवरील व मागचा भाग खाऊन फस्त केला आहे.

सकाळी शेतात गेल्यावर हा सर्व प्रकार संबंधित शेतकऱ्याच्या लक्षात आला. सदर शेतकऱ्याने संरपच प्रतिनिधी पराग माळी यांना सकाळी सातच्या सुमारास मोबाईलद्वारे घटनेची माहिती दिली. त्यांनतर पशुवैद्यकीय पर्यवेक्षक डॉ. गावित, वन विभागाचे कर्मचारी श्री. चौधरी यांनाही माहिती देण्यात आली. त्यांनी स्थानिक पाहणी व पंचनामा केला. यावेळी सरपंच प्रतिनिधी पराग माळी, पोलिस पाटील सुरेश पाटील, ग्रापंचायत सदस्य कन्हैयालाल काळे, इतर शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

माळमाथा परिसरातील उभरांडी, भामेर, नवागाव, खुडाणे भागात अनेक शेतकऱ्यांना बिबट्या वावरताना दिसला असून, सदर बिबट्या ही मादी असून तिच्यासोबत दोन लहान बछडेही आहेत. कालच भामेर शिवारातील नवागावच्या शेतकऱ्यांनी फटाके फोडून मादीला तेथून हाकलून लावले होते, अशी माहिती सरपंच प्रतिनिधी पराग माळी यांनी दिली.

Web Title: dhule news leopard killed cow in khudane area