मुख्यमंत्री पेयजल योजनेला विरोधामुळे 'ब्रेक'

प्रा. भगवान जगदाळे
शनिवार, 10 मार्च 2018

संबंधित शेतकरी राजकीय द्वेषापोटी विरोध करत असल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे. तर दुसऱ्या बाजूला निजामपूर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक चालवत नसून बाहेरचे तिसरेच कोणीतरी ग्रामपंचायत चालवत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते अनिल सोंजे यांनी केला आहे.

निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील ग्रामपंचायतीतर्फे मुख्यमंत्री पेयजल योजनेतून गावास सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या आखाडे गावाजवळील बुराई प्रकल्पापासून जुनी खराब पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. लाखो रुपये खर्चाच्या या योजनेला मात्र सद्या शेतकऱ्यांच्या विरोधामुळे 'ब्रेक' लागला आहे.

शेतकऱ्यांविरुद्ध ग्रामपंचायतीचे निवेदन
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई भासू नये म्हणून काही दिवसांपूर्वीच निजामपूर ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री पेयजल योजनेतून हे काम जलदगतीने हाती घेतले होते. सदर काम निजामपूरच्या आसपास येऊन पोहचले असतानाच अचानक परिसरातील काही शेतकऱ्यांनी विनंती करूनही शेतातून पाईपलाईन नेण्यास विरोध केला आहे. असा आरोप ग्रामपंचायतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केला आहे. जनहितार्थ संबंधित शेतकऱ्यांना समज देऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणीही ग्रामपंचायतीने तहसीलदारांकडे केली आहे. निवेदनावर सरपंच साधना राणे व ग्रामविकास अधिकारी शिवाजीराव पवार यांच्या सह्या आहेत.

ग्रामपंचायतीविरुद्ध शेतकऱ्यांचे निवेदन
ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता व कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता परस्पर जेसीबीने चाऱ्यांचे खोदकाम सुरू केले आहे. अगोदरच्या फुटलेल्या जुन्या पाईपलाईनमुळे शेतात पाणी साचले आहे व पिकांचेही नुकसान होत आहे. वास्तविक शेताच्या आजूबाजूला पाईपलाईन नेण्यासाठी जागा असतानाही ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांची परवानगी न घेता व सर्वे करताना शेतकऱ्यांना न बोलावता एका पंचायत समितीच्या सदस्याला व कनिष्ठ अभियंत्याला हाताशी धरून त्यांच्या मार्गदर्शनाने जाणीवपूर्वक आडमुठेपणाने हे काम सुरू केले आहे. वास्तविक शासनाकडून फिल्टरपासून गावापर्यंत संपूर्ण पाईपलाईन नवीन मंजूर झालेली असतानाही ग्रामपंचायतीने जुनीच पाईपलाईन दुरुस्ती करून रेटून नेण्याचा व वापरण्याचा अट्टाहास आणि केविलवाणा प्रयत्न चालवला आहे. असा आरोप संबंधित शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे. निवेदनावर राजू माळी (सूर्यवंशी), युवराज पाटील, गोकुळ पाटील, मोतीलाल माळी, सुमनबाई सोंजे, बाबूलाल वाणी, श्रीधर वाणी आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

Web Title: dhule news nijampur jaitane gram panchayat water issue