सोशल मीडियावर शिक्षकांचे ३१ प्रकार !

सोशल मीडियावर शिक्षकांचे ३१ प्रकार !
सोशल मीडियावर शिक्षकांचे ३१ प्रकार !

निजामपूर-जैताणे (धुळे) : सद्या शिक्षण क्षेत्रात कधी नव्हे एवढी प्रचंड विटंबना व अवहेलना पवित्र समजल्या जाणाऱ्या, शिक्षकी पेशात कार्यरत असलेल्या शिक्षकांना गेल्या काही वर्षांपासून सहन करावी लागतेय. सोशल मिडियाने तर याबाबत कहरच केला आहे. मास्तर शाळा सोडून गेले, गुरुजींनी संन्यास घेतला, गुरुजींनी विहिरीत उडी मारून जीव दिला, मास्तर कोमात, विद्यार्थी जोमात, गुरुजींनी राजीनामा दिला, गुरुजी वारीला गेले, गुरुजींनी विष घेऊन आत्महत्या केली. यासारखे गण्या, बंड्या आदी विनोदी पात्रांना घेऊन मास्तर/गुरुजींवर जोक्स करून एका प्रकारे शिक्षकांची फक्त शासकीय, प्रशासकीय पातळीवरच नव्हे तर सामाजिक, शैक्षणिक व राजकीय पातळीवरही प्रतिमा मलिन करण्याचा हिन प्रकार सुरू आहे. तो कुठे तरी थांबायला हवा, असे हल्लीच्या गुरुजींना वाटू लागले आहे.

'विनोदनिर्मिती' करणे हा जरी लोकांचा उद्देश असला तरीही परिस्थितीचे भान ठेवणे गरजेचे आहे. त्या व्याख्येत बसणारे, बोटावर मोजण्याइतके कदाचित काही शिक्षक असतीलही, परंतु आपण आगामी काळात भावी पिढीपुढे कोणता आदर्श ठेवतोय.? याचेही भान ठेवायला हवे. एके काळी "छडी लगे छमाछम, विद्या येई घमाघम." असे म्हणायचे दिवस आता कधीच संपलेत. प्राचीन काळापासून गुरूंची महती "गुरु ब्रम्हा, गुरुर्विष्णू, गुरुर्देवो महेश्वरा, गुरुसाक्षात परब्रह्म, तसमै श्री गुरुवे नमः" अशी सांगितली जात असे. अजूनही काही अंशी संस्कार व संस्कृती टिकून आहे. पण दिवसेंदिवस जर अशीच मूल्यांची घसरण होत राहिली. तर एक दिवस भावी पिढीला त्याची किंमत मोजवीच लागेल. 'गुरू' आणि 'गुरुजी' ही सन्माननीय पदवी कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. पूर्वीची शिक्षणपद्धती शिक्षककेंद्रीत होती, ती आज विद्यार्थीकेंद्रित झाली आहे.

पूर्वी शिक्षकाला 'गुरू', 'गुरुजी', 'गुरुवर्य', 'आचार्य', 'मास्तर' अशा पदव्या विद्यार्थी व समाजाने बहाल केल्या होत्या. त्याचे रूपांतर आता शिक्षक, प्राध्यापक, निदेशक, व्याख्याता, अधिव्याख्याता, प्रपाठक, सहाय्यक प्राध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य, अधिष्ठाता, कंत्राटी शिक्षण सेवक, सहाय्यक शिक्षक, सर, मॅडम यांच्यात झाले आहे. शिक्षक-शिक्षिकांनाही सर, मॅडम ही आधुनिक बिरुदे अलीकडे जास्तच आवडू लागली आहेत.

शासन-प्रशासन व शिक्षण विभागाने तर शिक्षकांची पुरती वाटच लावली आहे. कधी नव्हे एवढे जीआर शिक्षण खात्यातून गेल्या काही वर्षात निघाले. खाजगीकरण व विनाअनुदानित तत्वामुळे तर शिक्षकांचे इतके प्रकार निर्माण झाले की, सोशल मिडियावर विशेषतः शिक्षकांच्या व्हाट्सऍप ग्रुपवर अक्षरशः शिक्षकांचे ३१ प्रकार सांगितले जात आहेत. शिक्षण विभागासाठी ही नक्कीच खेदाची बाब आहे. विनोदाचा भाग बाजूला ठेवला तर आजच्या काही शैक्षणिक ध्येय-धोरणांमुळे खरंच विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांवर शेतकऱ्यांप्रमाणेच आत्महत्या करण्याची वेळ येऊन ठेपली आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही.

सोशल मीडियावरील शिक्षकांचे ३१ प्रकार पुढीलप्रमाणे...
१. १००% अनुदानित शिक्षक
२. अंशतः अनुदानित शिक्षक
३. विना अनुदानित शिक्षक
४. कायम विना अनुदानित शिक्षक
५. स्वयं अर्थसहाय्यित शिक्षक
७. पायाभूत पदवाढ प्रस्तावित शिक्षक
८. पायाभूत पद मंजूर परंतु वैयक्तिक मान्यता प्रलंबित शिक्षक
९. पायाभूत पद मंजूर, वैयक्तिक मान्यता प्राप्त परंतु आर्थिक तरतुदींच्या प्रतीक्षेतील शिक्षक
१०. अनुदानास पात्र घोषित तुकडीवरील शिक्षक
११. विनाअनुदानित, मूल्यांकनास पात्र परंतु अद्याप अघोषित शिक्षक
१२. अनुदानास पात्र परंतु आर्थिक तरतूदीच्या प्रतीक्षेत असलेले शिक्षक
१३. अनुदान पात्र, २०% टप्पा मंजूर परंतु २ वर्षांपासून पुढील अनुदान टप्प्याच्या प्रतिक्षेतील शिक्षक
१४. शिक्षण सेवक (सहा. शिक्षक, परिविक्षाधीन शिक्षक)
१५. जुनी पेन्शन योजना लागू असणारे शिक्षक
१६. नवीन पारिभाषीत अंशदान पेन्शन योजनेतील शिक्षक
१७. २००५ पूर्वीचे परंतु अंशतः अनुदानित असल्याने नवीन पेन्शन योजना लागू झालेले शिक्षक
१८. २००५ पूर्वीचे, अंशदान पेन्शन योजनेला कोर्टात आव्हान दिलेले म्हणून कुठलीच कपात नसणारे शिक्षक
१९. इंग्रजी माध्यमातील शिक्षक
२०. रात्रशाळेतील शिक्षक
२१. अल्पसंख्यांक शाळेतील शिक्षक
२२. अर्धवेळ शिक्षक
२३. घड्याळी तासिकेवरील शिक्षक
२४. कंत्राटी शिक्षक
२५. एकापेक्षा अधिक शाळेवर काम करणारा, एकत्रित कार्यभार गणना करून पूर्णवेळ झालेला शिक्षक
२६. नवनियुक्त परंतु वैयक्तिक मान्यतेच्या प्रतीक्षेत असणारा शिक्षक
२७. अतिरिक्त शिक्षक
२८. कला शिक्षक
२९. क्रीडा शिक्षक
३०. नुकतीच निवडपूर्व शिक्षक पात्रता परीक्षा दिलेला व शासनाच्या शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणारा नवीन होऊ घातलेला शिक्षक.
३१. २ मे २०१२ नंतर नियुक्त, शासन मान्यता प्राप्त, शासनाने अनधिकृत भरती म्हणून घोषित केलेला व न्यायालयाने न्याय दिलेला, तरीही डोक्यावर सतत टांगती तलवार असलेला शिक्षक..

जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात नसेल अशी शिक्षक पदाची, शिक्षकांची प्रतवारी तयार करून शिक्षणाच्या अनेक क्लिष्ट समस्या निर्माण करणाऱ्या शिक्षण खात्याला, शासन-प्रशासनाला सलाम करायलाही अनामिक लेखक विसरलेले दिसत नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com