धुळे: लोकसहभागातून घटबारी धरणाचे काम प्रगतीपथावर

भगवान जगदाळे
मंगळवार, 13 जून 2017

अवघ्या आठ महिन्यात लोकवर्गणी, लोकसहभाग व श्रमदानातून धरणनिर्मिती ही जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने खुडाणे ग्रामस्थ कौतुकास पात्र आहेत.
- गणेश मिसाळ, प्रांताधिकारी, धुळे

निजामपूर - आठ महिन्यांपूर्वी अर्थात गेल्या वर्षी 3 ऑक्टोबरला फुटलेल्या माळमाथा परिसरातील घटबारी धरणाचे काम सद्या जोरात व प्रगतीपथावर असून 20 मे रोजी सुरु झालेले धरणाचे काम अवघ्या 15 दिवसातच लोकसहभाग व श्रमदानातून सत्तर टक्के पूर्ण झाले आहे.

सुमारे 3500 ट्रॉली मातीचा भराव केला आहे. अशी माहिती सरपंच प्रतिनिधी पराग माळी दिली. नुकतीच प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी कामाची पाहणी केली. धरणाचे काम व गावकऱ्यांची एकी पाहून त्यांनीही समाधान व्यक्त केले. यावेळी तहसीलदार संदीप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पटले, वनविभागाचे अधिकारी पटवर्धन, पंचायत समितीचे अभियंता खैरनार, ए.सी.पाटील आदी उपस्थित होते. संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सुमारे 30 हजार रुपये देणगी देखील दिली.

यावेळी प्रांताधिकारी मिसाळ यांनी धरण बांधकामासाठी 5100 रुपये तर तहसीलदार भोसले यांनी 2100 रुपये वैयक्तिक देणगी दिली. कटर मशीन व पोकलॅड मशीन उपलब्ध करून देण्याचेही आश्वासनही मिसाळ यांनी दिले. देशबंधु मंजुगुप्ता फाउंडेशनचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक योगेश राऊत, प्रकल्प समन्वयक काकडे यांनी धरणाचे दगडी पिचिंगचे काम करून देण्याचे आश्वासन दिले. मिसाळ यांनी खुडाणे गावास भेट दिली. सुमारे अडीच ते तीन तास त्यांनी गावाच्या शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक बाबींविषयी चर्चा केली. तंटामुक्ती पुरस्कार मिळविल्याबद्दल त्यांनी खुडाणे ग्रामस्थांचे विशेष अभिनंदन व कौतुक केले. यावेळी सरपंच प्रतिनिधी पराग माळी, उपसरपंच नामदेव गवळे, माजी सरपंच धनराज गवळे, मधुकर वाघ, कन्हैयालाल काळे, महेंद्र हेमाडे, पांडुरंग महाले, कांतीलाल वंजारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यापूर्वीच भाजपचे प्रांतिक सदस्य सुरेश पाटील यांनी 51 हजार, भाजपचे तालुकाध्यक्ष संजय अहिरराव यांनी 11 हजार, उपसरपंच नामदेव गवळे यांनी 11 हजार, जिल्हा परिषद सदस्या उषा ठाकरे यांनी एकवीसशे तर सुंदरमाधव कन्स्ट्रक्शन साक्रीचे किशोर पाटील यांनी अकराशे रुपये देणगीसह आठ दिवस जेसीबी मशीन मोफत उपलब्ध करून दिले आहे.

"सर्वात मोठी शोकांतिका ही आहे की, शासकीय अधिकारी व कर्मचारी या घटबारी धरणाच्या बांधकामस्थळी भेट देतात. खुडाणे ग्रामस्थांची विचारपूस व धरणाची पाहणी करतात. काही किरकोळ स्वरूपाच्या देणग्या व मदतीचे आश्वासन देखील देतात. परंतु आजपर्यंत शासनाने आपल्या तिजोरीतून या कामासाठी एक दमडीसुद्धा आर्थिक मदत दिलेली नाही. ही अतिशय खेदाची व लाजिरवाणी बाब आहे."

अवघ्या आठ महिन्यात लोकवर्गणी, लोकसहभाग व श्रमदानातून धरणनिर्मिती ही जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने खुडाणे ग्रामस्थ कौतुकास पात्र आहेत.
- गणेश मिसाळ, प्रांताधिकारी, धुळे

Web Title: Dhule news people completed dam work in Nijampur