Dhule News : कार्यकारी अभियंतापदी अखेर रवींद्र पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule Municipal Corporation

Dhule News : कार्यकारी अभियंतापदी अखेर रवींद्र पाटील

धुळे : येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंतापदावरून दोन कार्यकारी अभियंत्यांमध्ये सुरू असलेल्या नाट्यावर अखेर पडदा पडला. बदली आदेशाविरोधात ‘मॅट’मध्ये गेलेल्या कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी यांची बदली मॅटने योग्य ठरविल्याने या नाट्यातील दुसरे कार्यकारी अभियंता रवींद्र पाटील यांनी सोमवारी (ता. १६) येथील कार्यकारी अभियंतापदाची सूत्रे स्वीकारली. कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत करत आनंदोत्सव साजरा केला.

हेही वाचा: Dhule News | चारशे कोटींचा निधी आणण्यात यश : आमदार रावल

धुळे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती घुगरी व कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी श्रीमती घुगरी यांच्याविरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर २८ डिसेंबरला राज्य शासनाने श्रीमती घुगरी यांची धुळे महापालिकेत बदली केली, तर श्रीमती घुगरी यांच्या जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी मनपातील रवींद्र पाटील यांची बदली केली होती.

मात्र या बदली आदेशाविरोधात श्रीमती घुगरी मॅटमध्ये गेल्या होत्या. मॅटने प्रारंभी श्रीमती घुगरी यांच्या बदली आदेशाला स्थगिती दिली. दरम्यानच्या काळात बांधकाम विभागात श्रीमती घुगरी यांच्यासह कार्यकारी अभियंता म्हणून श्री. पाटील यांनी एकाच दालनात बसून काम सुरू केले. एकाच दालनात एकाच पदावर दोन अधिकारी काम करत असल्याचा हा पेच निर्माण झाला होता.

हेही वाचा: Dhule News : ‘टक्केवारीच्या भिंती’तून शिवसेनेचे लक्षवेधी आंदोलन; अभियंत्यांचे निलंबन करण्याची मागणी

दरम्यान, १० जानेवारीला श्रीमती घुगरी यांच्या अर्जावर मॅटचे कामकाज सुरू झाले. सुनावणीअंती मॅटने राज्य शासनाने केलेली श्रीमती घुगरी यांची बदली योग्य ठरवत श्रीमती घुगरी यांचा अर्ज रद्द केला. या सर्व घडामोडीनंतर सोमवारी कार्यकारी अभियंता पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात पदभार स्वीकारला. कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत करत आनंदोत्सव साजरा केला.