निवृत्त जवानाचा गावकऱ्यांतर्फे नागरी सत्कार...

प्रा. भगवान जगदाळे
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

गिरीधर पवार सत्काराने गहिवरले, आनंदाश्रू अनावर...

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे): माळमाथा परिसरातील रूणमळी (ता. साक्री) येथील रहिवासी व लष्करातील जवान गिरीधर गुलाब पवार नुकतेच सतरा वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले. त्यानिमित्ताने गावकऱ्यांनी त्यांची गावातून भव्य मिरवणूक काढून ग्रामपंचायत चौकात झालेल्या कार्यक्रमात माता-पित्यासह, सपत्नीक भव्य नागरी सत्कार केला. यावेळी श्री. पवार यांना अश्रू अनावर झाले होते. प्रा. डॉ. रवींद्र ठाकरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

व्यासपीठावर त्यांचे वडील गुलाब पवार, आई शकुंतलाबाई पवार, पत्नी शोभाबाई पवार, ज्येष्ठ नेते वसंतराव पाटील, काशिनाथ पवार, मधुकर पवार, बळीराम पवार, कृष्णराव पवार, दगा पवार आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व भारतमाता, शिवरायांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. रूणमळी ग्रामस्थांतर्फे श्री. पवार व त्यांच्या कुटुंबियांचा भव्य नागरी सत्कार झाला. याप्रसंगी गिरीधर पवार, रवींद्र पवार, संजीवन पवार, वामन महिरे, प्रा. भगवान जगदाळे, प्रा. डॉ. रवींद्र ठाकरे आदींनी मनोगत व्यक्त केले. अनुराग जगदाळे ह्या बालकलाकाराने "संदेसे आते है!" हे देशभक्तीपर गीत सादर केले.

यावेळी बोलताना निवृत्त जवान गिरीधर पवार म्हणाले की, 'घर सोडून लष्करात नोकरी करणे इतके सोपे नाही. त्यासाठी त्याग करावा लागतो. घरची परिस्थिती गरिबीची, बेताची असूनही केवळ आई-वडीलांसह पत्नीच्या पाठिंब्यामुळे व त्यागामुळेच इतकी वर्षे मातृभूमीची प्रामाणिक सेवा करू शकलो. आगामी काळात गावातील विद्यार्थ्यांसह युवकांना पोलिस दलात, सैन्य दलात भरती होण्यासाठी, स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आपण मार्गदर्शन करू व प्रशिक्षण देऊ.'

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अतुल पवार, दिलीप पवार, चंद्रकांत पवार, अनिल पवार, रमेश पवार, संजीवन पवार, रवींद्र पवार आदींसह तरुण कार्यकर्ते व रूणमळी ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास ग्रामस्थांसह तरुण, लहान मुले व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतुल पवार यांनी प्रास्ताविक केले. नंदकिशोर वेंडाईत यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप पवार यांनी आभार मानले.

Web Title: dhule news retired soldier giridhar pawar homage