साक्री-नंदुरबार रस्त्यावरील खड्डयांचे बळी सुरूच

साक्री-नंदुरबार रस्त्यावरील खड्डयांचे बळी सुरूच
साक्री-नंदुरबार रस्त्यावरील खड्डयांचे बळी सुरूच

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील साक्री-नंदुरबार रस्त्यावरील वाजदरे घाटासह टिटाणे (ता. साक्री) शिवारात अपघातांची मालिका सुरूच असून, साक्री येथील पंचायत समिती-सदस्य शिक्षकानंतर रविवारी (ता. 26) पुन्हा एका तरुण आरोग्य सहाय्यकाचा मोटारसायकल अपघातात बळी गेला. अनेक जण जखमी देखील झाले आहेत. आठवडाभरात या ठिकाणी पाच अपघात झाल्याने हा राष्ट्रीय महामार्ग म्हणजे जणू काही मृत्यूचा सापळाच बनला आहे. तरी देखील शासन, प्रशासन व वाहनचालकांना जाग येत नाही हे विशेष आहे.

शेवाळी फाटा ते नेत्रांग व्हाया निजामपूर-जैताणे, छडवेल-कोर्डे, नंदुरबार, तळोदा, अक्कलकुवा, डेडियापाडा हा 108 किलोमीटरचा 753-बी राष्ट्रीय महामार्ग केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्रालयातर्फे गेल्या तीन वर्षांपासून मंजूर असून छडवेल ते दहीवेल या महामार्गाचेही काम प्रगतीपथावर आहे. परंतु नंदुरबार ते शेवाळी फाटा या 45 ते 50 किलोमीटर रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असून जागोजागी खड्डे पडले आहेत. या राष्ट्रीय महामार्गाची फक्त घोषणा झाली. परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणीचे काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

त्यातही नंदुरबार ते शेवाळी फाटा या 45 ते 50 किलोमीटर रस्त्याची वर्षभराची अपघातांची आकडेवारी शेकडोंच्या घरात आहे. ती आकडेवारी अतिशय बोलकी आहे. नंदूरबारहुन साक्रीकडे येताना जागोजागी खड्डयांसह वळणे, चढाव, उतार, घाट यांचे प्रमाण खूपच आहे. त्यातही नंदुरबार जेलरोड, नांदरखेडा, आष्टे, ठाणेपाडा, सिंदबन, टिटाणे, वाजदरे, रायपूर आणि कळंभीर याठिकाणी मोठमोठी वळणे आहेत. तर ठाणेपाडा, सिंदबन, वाजदरे व रायपूर याठिकाणी मोठ्या वळणांसह मोठमोठे घाट आहेत. आणि विशेषतः खड्डे चुकविण्याच्या नादात हे अपघात घडतात.

यापूर्वीही ठाणेपाड्याच्या नर्सरीजवळील वळणावर बस अपघातांची मालिका घडून गेली आहे. पण त्यातून कोणीही बोध घेत नाही वा कारणांचा शोध घेत नाही. ना शासन, ना प्रशासन, ना वाहनचालक? केवढी ही अनास्था? या बेफिकिरीमुळे असंख्य निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

या भागातील सौरऊर्जा व पवनऊर्जा प्रकल्पांमुळेही मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. म्हणून या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व चौपदरीकरण होणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वी जैताणे येथील संजयनगर पेट्रोल पंपाजवळही बसचालकाने खड्डे चुकविण्याच्या नादात एका शालेय विद्यार्थ्याला धडक दिली होती. त्यापूर्वीही येथील काहीजण अपघातात मृत्यमुखी पडले होते. रायपूर घाटावरही नागमोडी वळणांसह खड्डयांचे साम्राज्य पसरले असून तेथेही अपघात होण्याची दाट शक्यता आहे. परंतु कालांतराने या सर्व घटनांचा संबंधितांना विसर पडतो. साक्री ते नंदुरबार दरम्यान एक चेक पोस्ट/चेक नाका असणेही गरजेचे आहे.

वाहनचालकांचा बेदरकारपणा...
विशेषतः खाजगी वाहनचालक, मोटारसायकलस्वार व बसचालकांचा बेदरकारपणा सद्या खूपच वाढला आहे. त्यांच्यावरही अंकुश ठेवण्याची गरज आहे. "मोटारसायकलस्वारांनी हेल्मेट वापरणे गरजेचे असून शासनाने हेल्मेटसक्ती केलीच पाहिजे" अशी प्रतिक्रिया जैताणे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपीन वळवी यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर यांनीही "हेल्मेटसक्तीसह वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहतुकीचे नियम पाळावेत, कारचालकांनी सीटबेल्टचा वापर करावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर दिशादर्शक फलक लावावेत जेणेकरून अपघात होणार नाहीत." अशी प्रतिक्रिया 'सकाळ'शी बोलताना दिली. मद्यप्राशन करून जर कोणी वाहनचालक वाहन चालवताना आढळून आल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com