नाशिक विभागात शिक्षक आमदारकीसाठी मोर्चेबांधणी...

प्रा. भगवान जगदाळे
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

प्रा. संदीप बेडसे व विलासराव पाटील यांची जय्यत तयारी...

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : येत्या जुलै 2018 मध्ये शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांचा आमदारकीचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने धुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, शिरपूर येथील आर.सी.पटेल पॉलिटेक्निक कॉलेजचे प्रा. संदीप बेडसे व ओबीसी शिक्षक-पालक-विद्यार्थी असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस शिक्षक सेलचे विभागीय सचिव, धुळे येथील म्युनिसिपल हायस्कुलचे ज्येष्ठ शिक्षक विलासराव पाटील या दोघांनीही आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे.

विधान परिषदेत शिक्षक आमदारांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघात नाशिक, नगर, जळगाव, धुळे व नंदुरबार ह्या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यातही मागच्या वेळेस नाशिक जिल्ह्याला अपूर्व हिरे यांच्या रुपाने विधान परिषदेत प्रतिनिधीत्व मिळाले होते. त्यामुळे ह्यावेळी नाशिक जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्याला हे प्रतिनिधीत्व मिळावे असा सूर उमटताना दिसून येत आहे. प्रत्येक जिल्ह्याला संधी मिळाली पाहिजे असे काहींचे मत आहे. या निवडणुकीत शिक्षक संघटनांची व संस्थाचालकांची भूमिका अतिशय निर्णायक असते. राजकीय पक्ष आपले स्वतंत्र पक्ष पुरस्कृत उमेदवार देतात की शिक्षक संघटनांच्या उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतात हे पाहणेही औत्सुक्याचे ठरेल.

यापूर्वी धुळे जिल्ह्यातून माजी शिक्षक आमदार जे. यू. ठाकरे, जळगाव जिल्ह्यातून माजी आमदार दिलीपराव सोनवणे व चौधरी, नाशिक जिल्ह्यातून माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, नगर जिल्ह्यातून माजी आमदार  शिंदे आदींनी प्रतिनिधित्व केले आहे. सद्या 'टीडीएफ'सह अन्य शिक्षक संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या  वरिष्ठांसमवेत जिल्हा पातळीवर बैठका होत असून उमेदवारांची चाचपणीही सुरू आहे. त्यातही अन्य उमेदवारांच्या तुलनेत 'टीडीएफ'चा उमेदवार हा आमदारकीचा प्रमुख दावेदार मानला जातो. परंतु अनेकदा 'टीडीएफ'मध्येही फूट पडल्याचे व बंडखोरी झाल्याचे उदाहरण सर्वश्रुत आहे. त्यातही पुन्हा अपक्षांची भाऊगर्दी. त्यामुळे अधिकृत उमेदवारी नेमकी कोणाला मिळते याकडे जिल्ह्यातील सर्वसामान्य शिक्षकवर्गाचे लक्ष लागून आहे. शिक्षकांना शिक्षकांच्या समस्या सोडविणारा झुंजार आमदार हवाय.

प्रा. संदीप बेडसे हे साक्री तालुक्यासह धुळे जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत. तर विलासराव पाटील यांची जन्मभूमी अमळनेर असली तरी धुळे ही त्यांची कर्मभूमी आहे. प्रा. संदीप बेडसे यांना 'टीडीएफ'तर्फे उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. 'टीडीएफ'मधील इच्छुकांमध्ये त्यांचा क्रमांक सर्वात वरचा आहे. त्यांचे वडील कै. त्र्यंबकराव बेडसे हे स्वतः उत्तम शिक्षक होते. ते 'टीडीएफ'चे साक्री तालुकाध्यक्ष, धुळे जिल्हाध्यक्ष व राज्याचे कोषाध्यक्ष होते. तर अखिल भारतीय शिक्षक परिषदेचे कार्यकारिणी सदस्यही होते. प्रा. संदीप बेडसे हेही प्रशासनात एक उत्कृष्ट अधिकारी होते. एक अभ्यासू प्राध्यापक म्हणूनही त्यांची ओळख आहे. राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांचे ते निकटवर्तीय व विश्वासू कार्यकर्ते असून माजी आमदार अमरिशभाई पटेल यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. 

दुसऱ्या बाजूला विलासराव पाटील यांचे कार्यही मोठे आहे. एक अभ्यासू शिक्षक व संस्थाचालक म्हणून त्यांचीही ख्याती आहे. ते स्वतः काँग्रेस शिक्षक सेलचे विभागीय सचिव असून तेही काँग्रेसतर्फे उमेदवारी करण्यास इच्छुक आहेत. सन 2012 

ची शिक्षक शिक्षक आमदारकीची निवडणूकही त्यांनी लढविली. पण त्यात त्यांना यश आले नाही. ओबीसी विद्यार्थी-पालक-शिक्षक असोसिएशनचे ते प्रदेशाध्यक्ष असून त्यांनी वेळोवेळी शिक्षकांचे प्रश्न राज्यपातळीवर मांडले आहेत. तळागाळातील शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तेही एक उत्तम वक्ते असून आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याही नावाची शिक्षक वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

या निवडणुकीत जातीपातीच्या व गटातटाच्या संकुचित राजकारणाला कुठेही थारा नसतो. कारण इथे मतदार हा 'फक्त शिक्षक' असतो. आणि शिक्षक मतदार हा अतिशय चिकित्सक असतो. प्रा. संदीप बेडसे व विलासराव पाटील यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली असून आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

६ नोव्हेंबरपर्यंत अद्ययावत मतदारयादीत नावनोंदणीचे आवाहन...
सद्या ३ ऑक्टोबर पासून ते ६ नोव्हेंबरपर्यंत सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी आपापली नावे नवीन अद्ययावत मतदार यादीत नोंदवावीत असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. बऱ्याचदा उमेदवारी करणाऱ्या उमेदवाऱ्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत हे नावनोंदणी फॉर्म भरून घेतले जातात. परिणामी उमेदवार, संघटना अथवा पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा शिक्षक मतदारांवर प्रभाव पडू नये म्हणून ही मोहीम हाती घेण्यात आली असून प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी सदर शिक्षकांचे फॉर्म शाळा, महाविद्यालयांमार्फत भरून घ्यावेत असे आवाहनही करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत हे नावनोंदणी फॉर्म उपलब्ध असून फॉर्म भरल्यानंतर ते वेळेत जमा करण्याची सूचना करण्यात आली आहे. सोबत एक पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, आधार क्रमांक अथवा मतदान कार्ड क्रमांक, सेवेचा दाखला, विनंती पत्र आदी अचूक माहिती भरून फॉर्म जमा करण्याबाबतही कळविण्यात आले आहे.

 

Web Title: dhule news shikshak amdar teacher mla elections