धुळे: मूकबधिर विद्यार्थ्यांचीही श्री गणेश आराधना!

चेतना चौधरी
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

शिरपूरमध्ये लक्षवेधी सादरीकरण; मदतीचा हात फुलवितात प्रगतीचा अंकुर

धुळे: सनईचा सूर...निरनिराळ्या गीतांच्या तालावर बालके ठेका धरतात...पण गीते बालकांसाठी नव्हे तर प्रेक्षकांसाठी असतात...असे का हे सुरवातीला कुणालाही कळत नाही...नंतर लक्षात येते गीतांवर लीलया ठेका धरणारे बालकलाकार मूकबधिर आहेत ते... या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम शिरपूरमध्ये लक्ष वेधून घेत आहे. या बालकलाकारांची श्री गणेश आराधना आणि कलागुण पाहून त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा केल्याशिवाय भाविक राहात नाहीत.

शिरपूरमध्ये लक्षवेधी सादरीकरण; मदतीचा हात फुलवितात प्रगतीचा अंकुर

धुळे: सनईचा सूर...निरनिराळ्या गीतांच्या तालावर बालके ठेका धरतात...पण गीते बालकांसाठी नव्हे तर प्रेक्षकांसाठी असतात...असे का हे सुरवातीला कुणालाही कळत नाही...नंतर लक्षात येते गीतांवर लीलया ठेका धरणारे बालकलाकार मूकबधिर आहेत ते... या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम शिरपूरमध्ये लक्ष वेधून घेत आहे. या बालकलाकारांची श्री गणेश आराधना आणि कलागुण पाहून त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा केल्याशिवाय भाविक राहात नाहीत.

थाळनेर (ता. शिरपूर) क्षेत्रातील दामशेरपाडा येथील सावित्रीबाई फुले मूकबधिर विद्यालयातील बारा ते तेरा विद्यार्थ्यांच्या गटाकडून हा कार्यक्रम सादर होत आहे. त्यांनी शिक्षक राहुल पवार आणि राकेश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधनात्मक नाटिका आणि विविध गीतांवर नृत्ये बसविली आहेत. कार्यक्रमात मंचासमोर बसलेले शिक्षक गीत चालू झाल्यावर दोनच बोटांनी खुणावतात आणि त्या आधारावर संबंधित बालकलाकार विद्यार्थी नृत्य करतात. गीत ऐकू येत नाही, पण गाण्याच्या प्रत्येक शब्दावर ते अचूक ठेका धरतात.

कलेतून मदतीची अपेक्षा
विद्यालय विनाअनुदानित असल्याने दानशूरांच्या मदतीनेच त्यांचे पालन पोषण होते. गरीब आणि पाड्यावरच्या या दुर्लक्षित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न होत असताना त्यांच्यासाठी येणाऱ्या खर्चाचा नेहमीच प्रश्‍न पडतो. त्यांच्यासाठी संस्थाध्यक्षा आशा पवार स्वतः दानशूरांना आवाहन करत असतात. सादरीकरणासाठी ते जिवापाड मेहनत घेतात आणि कौतुकाची थाप मिळवितात. त्यांची गरज लक्षात घेऊन कुणी आर्थिक मदत करतो, तर कुणी शालेय साहित्य, किराणा देतात. अशा मदतीतूनच या मूकबधिर विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रगतीचा अंकुर फुलताना दिसतो.

दोन हजार कार्यक्रम
मूकबधिर विद्यालयातील या विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची चर्चा होत असताना शाळांमध्ये सादरीकरणाची परवानगी मागण्यात आली. आदल्यादिवशी या विद्यार्थ्यांविषयी सूचना देत मदतीचे आवाहन केले गेले. शिरपूरमधील हिरानगर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सूचनेनुसार मदतीसाठी पालकांकडून पैसे आणले. पण त्यांनी उत्कृष्ट सादरीकरण पाहून आपल्याजवळील खाऊचे पैसेही या बालकलाकार मूकबधिर विद्यार्थ्यांना देऊन टाकले. संबंधित मूकबधिर विद्यार्थ्यांनी श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक मंडळ, आर. सी. पाटील विद्यालय यासह अन्य विविध शाळा आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्येही आतापर्यंत दोन हजारांपेक्षा अधिक कार्यक्रम केले आहेत हे विशेष.

शब्दाविना संवादाने मदतीची हाक
मंचावर गीतांच्या आवाजाने अचूक ठेका धरणारे संबंधित मूकबधिर विद्यार्थी जणू शब्दाविना संवाद साधतात. टाळ्यांची दाद मिळवितात. समाज प्रबोधनपर नाटिकाही इशाऱ्यांद्वारे सादर करतात. त्यांची दुर्दम्य इच्छाशक्‍ती, स्वावलंबनाचा आनंद उपस्थितांनाही थक्‍क करणारा ठरतो. कार्यक्रमानंतर मंचावरील बालकलाकार विद्यार्थी मूकबधिर असल्याचे कळते. त्यावेळी संवेदनशील मनांचे हात मदतीसाठी पुढे येतात.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
सरकारी थकबाकीदार सत्यपाल सिंह मंत्रिमंडळात 
दुर्दैवी अनिता अन्‌ तमीळ अस्मिता...!
धुळे जिल्ह्यात 351 वर्गखोल्या धोकादायक
एकाच कुटूंबातील 3 भावंडांचा तलावात बुडून मृत्यू
मानाच्या बाप्पांचे यंदाही हौदांमध्ये विसर्जन
भाविकांच्या गर्दीने रस्ते दिसेनासे झाले
'व्हेंटिलेटर' आणि 'हाफ तिकीट' सर्वोत्कृष्ट चित्रपट

Web Title: dhule news Shree Ganesh Ardhana special student