डोळ्यात अश्रू अन् हातात दहावीचा पेपर...

जगन्नाथ पाटील
गुरुवार, 22 मार्च 2018

भावाच्या अंत्ययात्रेनंतर दिला पेपर : धनूर येथील दीपालीचे धैर्य

भावाच्या अंत्ययात्रेनंतर दिला पेपर : धनूर येथील दीपालीचे धैर्य

कापडणे (धुळे) : भावासाठी दीपाली अन् आईने मोलमजूरी करीत होते. त्याला शिकवून मोठे करायचे होते. पण पवन अचानक आजारी पडतो. मुंबईचे रुग्णालय गाठावे लागते. पण प्रयत्न अपयशी ठरलेत. पवनचे निधन झाले. बुधवारी (ता. 21) रात्रीच अंत्ययात्रा झाली. एकुलत्या भावाच्या अंत्ययात्रेनंतर दीपालीने स्वतःसह आईलाही सावरले. सकाळी लवकर उठत. अभ्यासातही मन रमविण्याचा प्रयत्न केला. काल आणि आज दहावीचा अनुक्रमे भूगोल आणि आयसीटीचा पेपरही दिला. पाषाणाला पाझर फोडणार्‍या या प्रसंगात दीपालीच्या धीरोदत्त मनाचे आदर्श उदाहरण निर्माण झाले आहे.
 
धनुर (ता. धुळे) येथील दीपाली जगदीश पाटील ही महात्मा फुले विद्यालयातील दहावीत आहे. हुशार आहे. स्वमेहनत करुन शिक्षण घेत आहे. तिचा एकुलता लाडका भाऊ पवन जगदीश पाटील (वय 10) पाचवीत त्याच शाळेत शिकायचा. भावासोबत दररोज शाळेत जाणे. त्याचा अभ्यास करुन घेणे दीपालीच बघायची. पवन आणि दीपाली गावात बहिण भावाच्या प्रेमाचे अद्वितीय उदाहरण होते. काही दिवसापुर्वी पवन आजारी पडला. किडनीचा दुर्धर आजार असल्याचे निदान झाले. आई आणि दीपालीवर आकाशच कोसळले. वडीलांचे छत्र हरपलेले. अल्पभूधारक आणि रोजंदारी करणार्‍या मायलेकींनी पवनवर उपचार सुरु केले. मात्र, यश आले नाही. अवघ्या सहा दिवसात पवनने मृत्यूला कवटाळले.

दीपालीच्या धैर्याला सलाम...
दीपालीला भावाच्या मृत्यूने धक्का बसला. तिने स्वतःला सावरले. गंभीर परीस्थितीतही अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. अन कापडणे येथील बोरसे विद्यालयाच्या केंद्रावर भूगोल आणि आसीटीचे असे दोन पेपरही दिलेत. आज आयसीटीचा पेपर देवून आल्यानंतर मनावरचा बांध फुटला अन आसवांना वाट करुन दिली. दीपालीच्या धैर्याचा सर्वत्र सन्मान होत आहे.

अधिक माहितीसाठी अथवा मदतीसाठी संपर्कः
जगन्नाथ पाटील 94034 35213

Web Title: dhule news ssc examination deepali patil brother no more